विरोधकांना विदर्भाचा विकास बघवत नाही: सुधीर मुनगंटीवार
नागपूर, २० डिसेंबर २०२२ : विरोधकांना जनतेचे प्रश्न सोडवायचे नाहीत, त्यांना विदर्भाचा विकास बघवत नाही त्यामुळेच विधिमंडळाचे कामकाज बंद पाडले जाते, अशी खरमरीत टिका सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. विधिमंडळ आवारात ते विविध वृत्तवाहिन्या आणि पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी बोलताना श्री मुनगंटीवार पुढे म्हणाले की दीर्घ काळानंतर विदर्भात विधिमंडळाचे अधिवेशन होत आहे. मध्यंतरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी नागपूरात अधिवेशन होऊ दिले नाही आणि आज त्यांनी नागपुरात पाऊल ठेवल्या ठेवल्या विधिमंडळाचे कामकाज बंद पाडले गेले, असे सांगून श्री मुनगंटीवार पुढे म्हणाले की या लोकांना जनतेशी बांधिलकी नाही, हे ते वारंवार सिद्ध करीत आहेत. दोन वर्षे या मंडळींनी ज्या पद्धतीचा कारभार केला ते पाहता जनता या पक्षांना कायमच विरोधी पक्षात बसविणार आहे असेही ते पुढे म्हणाले.
विधान परिषदेत विरोधकांनी जे आरोप मुख्यमंत्र्यांवर केले त्या आरोपाच्या डोंगरातून छोटा उंदीरही निघाला नाही, एका वकिलाचे कोर्टात मांडलेले म्हणणे हे न्यायाधिशांचे ताशेरे म्हणून खपविण्याचे विरोधकांचे उद्योग फडणविसांनी क्षणात उघडे पाडले असे ते पुढे म्हणाले.
भाजपाच राज्यात अव्वल हे पुन्हा सिद्ध
ग्राम पंचायत निवडणुकांच्या आजच्या निकालावरून राज्यात भाजपाच क्रमांक एकचा पक्ष असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे, असे ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ग्रामपंचायत निवडणुका पक्ष चिन्हांवर होत नसल्या तरी भाजपाकडे प्राथमिक सदस्यांची संगणकीकृत यादी तयार आहे. त्यावरून निवडून आलेले सर्वाधिक सरपंच आमचेच आहेत आणि भाजपाच राज्यात क्रमांक एकचा पक्ष आहे हे विश्वासाने सांगू शकतो असे ते म्हणाले.