uddhav Thackeray

‘मविआ’च्या काळात न फुटलेले घरकोंबडा ब्रॅंडचे फटाके..भाजपनं पुन्हा उद्धव ठाकरेंना डिवचलं

पुणे, २४ आॅक्टोबर २०२२: गेल्या काही दिवसांपासून राज्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद दौऱ्यावर जाऊन पिकांची पाहणी केली आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. या निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ अन् केवळ घोषणांची अतिवृष्टी आहे त्यांनी आमच्याशी गद्दारी केली. मात्र शेतकऱ्यांशी करू नका, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर भाजप नेत्यांकडून टीका केली जात असून भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्य़मातून ठाकरेंवर खोचक शब्दात टीका केली आहे.
भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, “मविआच्या काळात न फुटलेले घरकोंबडा ब्रॅंडचे फटाके, ॲपटीबार…घरटीबॅाम्ब…सुरसुरी, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. भातखळकर यांनी ट्विटमध्ये एका फटाक्यांच्या बॉक्स आणि उद्धव ठाकरे यांचा एक फोटो शेअर केला. तर या ट्विटला उपरोधिक कॅप्शन देत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, ठाकरे यांनी नुकत्याच केलेल्या औरंगाबाद दौऱ्यावर असतांना सरकारवर जोरदार टीका करत बंडखोर खासदार, आमदारांवर देखील हल्लाबोल केला होता.

या निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ अन् केवळ घोषणांची अतिवृष्टी आहे. आसूड फक्त हातात ठेवू नका तर तो वापरा. सरकारला पाझर फुटत नसेल तर घाम फोडा. आमच्याशी गद्दारी केली, शेतकऱ्यांशी करू नका, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री शिंदे  यांच्यावर अप्रत्यपणे टीका केली होती. यावर आता भाजप आणि शिंदे गटाकडून प्रत्युत्तर दिल जात आहे.