पवारांचा फेक नेरेटिव्ह फडणवीसांनी खोडून काढला

कोल्हापूर, ७ डिसेंबर २०२४ ः विधानसभा निवडणुकीत आम्हाला ७१ लाख मत मिळाली पण केवळ १० आमदार निवडून आले. तर अजित पवारांना केवळ ५८ लाख मते मिळूनही त्यांचे ४१ आमदार निवडून आल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी निकालावर संशय व्यक्त केला. त्यामुळे महायुतीच्या विरोधात वातावरण तयार होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२४, २०१९ च्या लोकसभा निवडवणुकीतील आकडेवारीसह पवारांना उत्तर दिले. पराभव स्विकारल्यास आपण यातून लवकर बाहेर याल असा टोलाही फडणवीस यांनी मारला.

आज कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत असताना शरद पवार यांनी विधानसभा निकालासह अजित पवार यांना मिळालेली क्लीन चीट, इंडिया आघाडीतील वाद, अबु आझमी यांचा मविआला सोडचिठ्ठी अशा विविध विषयांवर सडेतोड भाष्य केले. शरद पवार म्हणाले, “महाविकास आघाडी यापुढील काळातही एकत्रित निवडणुकांना सामोरे जाणार आहे. पराभव झाला म्हणून नाउमेद व्हायचे नसते. निवडणुकीला काही पर्याय नसतो. मी आयुष्यात १४ निवडणूक लढलो, मला कधीही पराभव पाहावा लागला नाही. पण यावेळेला राज्यात आम्हाला पराभव पाहायला मिळाला. जरी पराभव आला तरी चिंता करायची नसते. लोकांमध्ये जावे लागते आणि लोक चिंताग्रस्त आहेत, असे आम्हाला दिसते. लोकांमध्ये उत्साह दिसत नाही. निवडणूक झाल्यानंतर एक उत्साह दिसतो, तो मात्र यावेळेला दिसत नाही.”

काँग्रेस पक्षाला ८० लाख मते पडली आणि त्यांचे फक्त १६ आमदार निवडून आले. तर शिवसेना शिंदे गटाला ७९ लाख मते मिळाली आहेत, तर त्यांचे ५७ आमदार निवडून आले आहेत. म्हणजे एक लाख कमी मतदान मिळूनही जवळपास ४१ आमदार अधिक निवडून आले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मते ७२ लाख आहेत. पण आमदार निवडून आले फक्त १० आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला ५८ लाख एवढे मतदान मिळाले, पण त्यांचे ४१ आमदार निवडून आले आहेत.

फडणवीस यांचे खणखणीत उत्तर

यास फडणवीस यांनी समाज माध्यमावरून शरद पवारांना उत्तर दिले आहे. शरद पवार आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा?
चला २०२४ लोकसभेत काय झाले ते पाहू,
भाजपाला मतं १, ४९, १३, ९१४ जागा ९, पण काँग्रेसला मतं ९६ लाख ४१, ८५६ आणि जागा १३ जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला ७३,७७, ६७४ मत आणि ७ जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला ५८, ५१, १६६ मत मिळून ८ जागांवर विजय मिळाला.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील आकडेवारी तर फारच बोलकी आहे. काँग्रेसला ८७, ९२, २३७ मते मिळाली व केवळ एक खासदार निवडून आला. तर तत्कालीन राष्ट्रवादीला ८३, ८७, ३६३ मते मिळवून ४ आल्या होत्या.
पराभव स्वीकारला तर यातून आपण यातून लवकर बाहेर याल. तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे, असे फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.