ट्रम्पेटने मते घेतल्याने मलाही फायदा, वळसे पाटलांची माध्यमांसमोर जाहीर कबुली
मुंबई, २५ नोव्हेंबर २०२४ : आंबेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील अवघ्या पंधराशे मतांनी निवडून आले. त्यांचा थोडक्यात पराभव होताना राहिला. त्यावर वळसे पाटील यांनी माझा पराभव होणार होता, पण मी अपक्ष उमेदवाराला दिलेल्या ट्रम्पटे चिन्हामुळे थोडक्यात बचावले अशी कबुली दिली. वळसे पाटील यांनी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवारांची भेट घेतली.
त्यानंतर माध्यमांशी बोलतांना वळसे पाटील म्हणाले, आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आल्याने मी या बैठकीसाठी आलो. प्रतिष्ठानचा विश्वस्त या नात्याने मी या बैठकीला हजर होतो. बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयावर उपयुक्त अशी चर्चा झाली, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं वळसे पाटील म्हणाले.
अजितदादांच्या अनेक उमेदवारांना ‘ट्रम्पेट’ या निवडणूक चिन्हाचा फायदा झाला. याविषयी विचारले असता ते वळसे पाटील म्हणाले की, होय, मलाही ट्रम्पेटचा फायदा झाला, असं जाहीरपणे माध्यमांसमोर मान्य केले. माझ्या इथे ट्रम्पेटने मते घेतली. मात्र इतर मतदारसंघात कुणाला किती फायदा झाला हे माहीत नसल्याचे ते म्हणाले.
मी पवार साहेबांचे आशीर्वाद घेतले…
शरद पवारांनी तुमच्या मतदारसंघात जाऊन गद्दारांना पाडा, असं म्हटलं होतं. पण, आता तुमच्या विजयानंतर त्यांनी तुमचे अभिनंदन केले का? या प्रश्नावर वळसे-पाटील म्हणाले की, शरद पवार यांचे मी आशीर्वाद घेतले. ते सभेत काय बोलले आणि काय नाही हे सर्व मी विसरून गेलेलो आहे. मी फक्त त्यांचे दर्शन घेतलं आणि आशीर्वाद घेतले. बाकी काही नाही, असं वळसे पाटील म्हणाले.
राम शिंदेंच्या आरोपांत तथ्य नाही…
भाजपचे नेते राम शिंदे यांनी केलेल्या आरोपावर बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, तसे काही झाले असावे, असे मला वाटत नाही. दोन्ही पवार एकत्र येण्याबाबत अजून तशी चर्चा, विचार समोर आलेला नाही, असे वळसे पाटील म्हणाले. शिंदे यांच्या आरोपात तथ्य नाही. मुख्यमंत्री पदाबाबत आमचे व महायुतीच्या पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असंही वळसे पाटील यांनी म्हटले आहे
आंबेगावमध्ये ट्रम्पेटला २९६४
पुण्यातील आंबेगाव मतदार संघातून अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचा निसटता विजय झाला. त्यांच्याविरोधात शरद पवार यांनी देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा १५२३ मतांनी पराभव झाला. मात्र ट्रम्पेट चिन्हावर उभ्या असणाऱ्या उमेदवाराला २९६५ मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे या ट्रम्पेट चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराचे नावही देवदत्त निकम हेच होते.