१२ तासांच्या आत मुख्यमंत्रीपद घोषित करण्याची काँग्रेसची खेळ
मुंबई, २२ नोव्हेंबर २०२४ ः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. महाविकास आघाडीने निकालानंतरच्या हालचालींसाठी आधीच प्लॅन आखला आहे. विजय वडेट्टीवार यांनी १२ तासांत मुख्यमंत्रीपदाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली आहे. महाविकास आघाडी १६०-१६५ जागा जिंकेल, असा त्यांचा दावा आहे. सर्व पक्ष नेत्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या असून, मतमोजणीदरम्यान काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य केले आहे.
“उद्या सत्तेतला आमदार म्हणून मी राहीन, असा मला विश्वास वाटतो. विश्वास नाही तर खात्री आहे, आणि उद्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापनेचा दावा उद्या रात्रीच करणार आहोत. महाविकास आघाडी १६०-१६५ जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही, एक्झिट पोल वगैरे नंतर बघू. सगळ्या लोकांना उद्याच्या मतमोजणीसाठी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. काय काळजी घेतली पाहिजे ते सांगितले आहे. पूर्ण मतमोजणी होईपर्यंत मतदान केंद्र सोडायचं नाही अशा सूचना दिलेल्या आहेत”, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.
कोण सत्तेत येईल ते उद्या कळेलच, उद्या दुपारी १२ ते १ वाजता चित्र स्पष्ट होईल आणि तुम्हाला महाराष्ट्रातून महायुती हद्दपार झालेली दिसेल. हायकमांड जो निर्णय घेईल तो माझ्यासाठी अंतिम आहे. दोनदा विरोधी पक्ष, नेतेपद सांभाळलेलं आहे, माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मायक्रो ओबीसीच्या व्यक्तीला जबाबदारी दिली आहे आणि मी प्रामाणिकपणे समर्थपणे ती पार पाडली आहे. आमची उद्या सत्ता येणार आणि मी सत्तेमध्ये असणार”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
आम्ही जे काम हाती घेतलं ते काम प्रामाणिकपणे पूर्ण केलं. बारा तासाच्या आत मुख्यमंत्रीपद आम्ही घोषित करू. हायकमांडने विदर्भाची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. माझ्यावर सर्वांना घेऊन जाण्याची जबाबदारी आहे”, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. “आजची बैठक जबाबदारीची होती, कालच्या मीटिंगमध्ये काय करायचं, शरद पवार यांचं मार्गदर्शन आहे, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आम्हाला वारंवार सूचना करत आहेत. कोणी कोणती जबाबदारी पार पाडायची हे ठरलेलं आहे. तुम्हाला परवा सत्ता स्थापनेचा मंडप दिसेल”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
वडेट्टीवार मुख्यमंत्रीपदाबाबत काय म्हणाले?
“जेवढे काँग्रेस विचारसरणीच्या मंडळी आहेत, ते आमचेच आहेत. कुणी बंडखोरी केली असेल किंवा अपक्ष असतील त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांच्यात आहे. त्यांच्याबाबत पक्ष श्रेष्ठींनी चर्चा सुरू केली असावी. काँग्रेसला मुख्यमंत्रीपद भेटावं हे काँग्रेसजणांची इच्छा आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतही तशी इच्छा आहे, पण तीनही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र येऊन जो निर्णय होईल आणि तो निर्णय अंतिम असेल”, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.