जेथे छोटे पक्ष जिंकतील त्या जागा सोडू: संजय राऊतांनी सांगितला नवा फॉर्मुला
मुंबई, २६ ऑक्टोबर २०२४: मविआमध्ये समजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष असे छोटे पक्ष सुद्धा आहेत. त्यांच्याही जागा वाटपाच्या काही मागण्या आहेत. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘शेकाप पक्षासोबत आज आमची बैठक आहे. शरद पवार यांनी शेकाप पक्षाचे ज्येष्ठ नेते यांच्याशी चर्चा सुरू केलेली आहे. आज दिवसभरात आम्ही चर्चा करू. जिथे जिथे मित्र पक्ष जिंकण्याची शक्यता आहे ती जागा आम्ही त्यांना देऊ असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
सांगोल्याची जागा शिवसेनेची आहे. तिकडे शिवसेनेचे आमदार होते. अलिबागला देखील दोन वेळा शिवसेना जिंकलेली आहे. अशा अनेक जागा आहेत ज्याच्यावर आज आणि उद्या चर्चा होऊ शकते असंही राऊत म्हणाले आहेत. जयश्री थोरातांसदर्भात भाजपा नेते वसंतराव देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पार्टीला दंगली घडवायच्या आहेत. भाजपा संस्कारहीन पक्ष आहे, विकृत लोक त्या पक्षात भरलेले आहेत. घरंदाज व राजकारणातल्या चांगल्या स्त्रियांविषयी अपशब्द वापरणं आणि त्यातून तणाव निर्माण करणं हा नवीन धंदा त्यांनी सुरू केला आहे.
योगी आदित्यनाथ आमचे चांगले मित्र आहेत. बाबाजींचा आम्ही आदर करतो. ते आमचे बाबाजी आहेत, आम्ही आमचे प्रेम आणि आशीर्वाद एकामेकात वाटून घेतो. मात्र, आता राजकारणाची गोष्ट आहे, यात महाराष्ट्रात येऊन बाबाजी काय करतील?. बाबाजी प्रत्येक ठिकाणी जातात. बाबाजी आपल्या स्वतःच्या उत्तर प्रदेशमध्ये आपल्या पार्टीला वाचवू शकले नाहीत. लोकसभेत अयोध्येत देखील वाचवू शकले नाहीत, मग ते महाराष्ट्रात येऊन काय करणार? अशा शब्दात संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथांवर टीका केली.