काँग्रेसची ४८ उमेदवारांची यादी जाहीर, दिग्गज नेत्यांना संधी

मुंबई, २४ आॅक्टोबर २०२४: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या उमेदवार यादीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. विशेष म्हणजे महायुतीच्या तीनही घटक पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली, महाविकास आघाडीतून ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 48 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या यादीत काही ठिकाणी विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा सुटला नव्हता. त्यामुळे काँग्रेसची उमेदवार यादी येण्यास विलंब झाला. अजूनही अनेक जागांवरचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत.

अखेर महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेनंतर काँग्रेसकडून देखील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 48 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अक्कलकुवातून के. सी. पाडवी, शहादा येथून राजेंद्र गावित, धुळे ग्रामीणमधून कुणाल पाटील, नंदुरबारमधून किरण तडवी, रावेरमधून धनंजय चौधरी, मलकापूरमधून राजेश एकडे, नवापूर येथून शिरीशकुमार नाईक, चिखलीतून राहुल बोंद्रे यांच्या नावांचा समावेश आहे.

वर्षा गायकवाड यांच्या बहिणीला संधी

धारावीतून वर्षा गायकवाड यांच्या भगिणी डॉक्टर ज्योती गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर माजी मंत्री नसीम खान यांना चांदीवलीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तिथे त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दिलीप लांडे यांचं आव्हान असणार आहे.

विश्वजीत कदम यांची पहिली प्रतिक्रिया

काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांना पलूस कडेगाव मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विश्वजीत कदम यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “मी प्रथमत: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि आमचे सर्वांचे नेते राहुल गांधी यांचे आभार मानेल. त्यांनी मला पुन्हा पलूस-कडेगावच्या नागरिकांची सेवा करण्याची संधी दिली. मी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचे आणि जनतेचे आभार मानतो”, अशी प्रतिक्रिया विश्वजित कदम यांनी दिली.