कोल्हापुरातील बडा नेता शरद पवार गटात प्रवेश करणार?

कोल्हापूर, ३० सप्टेंबर २०२४ :विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे. या दौऱ्या दरम्यान शरद पवार विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यातून ते आगामी निवडणुकीची रणनिती ठरवतायेत. काहीच दिवसांआधी शरद पवारांनी कोल्हापूर भाजपला मोठा धक्का दिला. समरजित घाटगे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर आता कोल्हापुरात शरद पवार भाजपला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. चंदगडमधील भाजपचे नेते शिवाजीराव पाटील हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला पुन्हा खिंडार पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हयातील भाजपचा मोठा नेता शरद पवार यांच्या गळाला लागला असल्याची चर्चा होत आहे. चंदगडमध्ये कागलची पुनरावृत्ती होणार असल्याचं बोललं जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगडमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. भाजप नेते शिवाजीराव पाटील तुतारी हातात घेणार असल्याची चर्चा आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडून पाटील यांच्याशी संपर्क झाल्याची माहिती आहे.

शिवाजीराव पाटील शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. कागलमधून समरजीत घाटगे यापूर्वीच पवारांच्या पक्षात आले आहेत. आता चंदगडमधून शिवाजीराव पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. शिवाजीराव पाटील देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. शिवाजीराव पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होऊ लागल्याने भाजपचे कार्यकर्ते चिंतेत आहेत. भाजप नेतृत्व कोल्हापूर जिल्ह्यात लक्ष देणार की नाही? असा सवाल सामान्य कार्यकर्ते विचारत आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाला लागलेली गळती थांबवण्यात पक्ष नेतृत्व यशस्वी होणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

शिवाजीराव पाटील यांनी जर शरद पवार गटात प्रवेश केला तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा धक्का असेल. येत्या काळात शिवाजीराव पाटील हे काय भूमिका घेतात? शरद पवार गटात प्रवेश करतात का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.