पक्षफुटीनंतरही ठाकरे गटाची मुंबई विद्यापीठात बाजी

मुंबई, २७ सप्टेंबर २०२४: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज (२७ सप्टेंबर ) निकाल लागला असून ठाकरे गटाच्या युवा सेनेने जोरदार मुसंडी मारल्याचे निकालातून स्पष्ट होत आहे. या निवडणुकीसाठी २४ सप्टेंबर रोजी मतदान पार पडले होते. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार युवासेनेच्या दहापैकी आठ उमेदवारांचा विजय झाला आहे. ही निवडणूक ठाकरे गटाची युवासेना विरुद्ध भाजपा पुरस्कृत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये चुरशीची झाली होती. ठाकरे गटाच्या युवा सेनेचा आठ जागांवर विजय झाल्यामुळे भारतीय विद्यार्थी परिषदेला धक्का बसला आहे. दरम्यान, अजून मतमोजणी सुरु असून थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होईल.

ठाकरे गटाच्या युवा सेनेचे अनुसूचित जाती (ए.सी.) प्रवर्गातून शितल शेठ – देवरुखकर, अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातून डॉ. धनराज कोहचाडे, विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती (डीटी – एनटी) प्रवर्गातून शशिकांत झोरे, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी) प्रवर्गातून मयूर पांचाळ, महिला प्रवर्गातून स्नेहा गवळी हे उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले आहेत.

राखीव जागांमधून पाच पैकी पाच जागांवर विजय मिळविल्यानंतर खुल्या गटातूनही तीन जणांचा विजय झाला आहे. खुल्या गटातून प्रदीप सावंत यांनी ठरलेल्या कोट्यापेक्षा अधिक मते घेऊन विजय मिळविला आहे. त्यांच्यानंतर मिलिंद साटम आणि अल्पेश भोईर यांचा विजय झाला असल्याची माहिती वरुण सरदेसाई यांनी दिली. आता दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी होत आहे. यानंतर उरलेल्या दोन जागांचा निकाल जाहीर होईल, असेही सरदेसाई म्हणाले.

मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात मतमोजणी सुरू आहे. यंदा १३ हजार ४०६ मतदारांपैकी जवळपास ५५ टक्के मतदारांनी मतदान केले. त्यानुसार ७ हजार २०० मतांपैकी ६ हजार ६८४ मते वैध आणि ५१६ मते अवैध ठरली आहेत. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना विजयासाठी जवळपास १ हजार ११४ मतांचा कोटा पार करणे आवश्यक आहे. मतमोजणीच्या ठिकाणी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आवाज कोणाचा शिवसेनेचा – युवा सेनेचा, शिवसेना – युवा सेना जिंदाबाद, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा विजय असो आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे. कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू असून पुष्पगुच्छ देण्यासह पेढे वाटले जात आहेत.

ठाकरे गटाच्या युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई म्हणाले, शिंदे – भाजप सरकार सुरुवातीपासूनच रडीचा डाव खेळत होते. परंतु तरीही आम्ही सर्व जागांवर विजय संपादन करू,’