जळगावमध्ये भाजपला खिंडार माजी जिल्हा अध्यक्ष खोडपेंचा राजीनामा

जळगाव, ता. १६/०९/२०२४: जामनेर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षातील अपमानास्पद वागणूक, सातत्याने डावलणे, तालुक्यात मूळ विचार व ध्येय धोरणांपासून पक्ष दूर जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. खोपडे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.

खोडपे म्हणाले, गेल्या ३५ वर्षांपासून मी भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करत आलो. जेव्हा पक्षाची परिस्थिती अतिशय खराब होती व टोकाचा संघर्ष करायचा होता, तेव्हा तो संघर्ष मी पक्षाच्या सर्व माझ्या सहकाऱ्यांसोबत केला. मी कधीही पक्षाकडे पद अथवा लाभाची कामे मागितली नाहीत. मी आणि माझ्या सर्व जिवाभावाच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संघर्षामुळे मला ते आपसूकच मिळत गेले, तर बऱ्याच वेळेस माझे कार्यकर्ते व सहकाऱ्यांसाठी मी अनेक पदांचा त्यागही केला. परंतु मागील दहा वर्षापासून पक्षामध्ये स्वकर्तृत्वाने मोठे होण्यापेक्षा दुसऱ्याला नालायक ठरवून मोठे होण्याची स्पर्धा सुरू झाली.

पक्षात गटबाजी, दहशत
पक्षाच्या मूळ ध्येयधोरणांपासून दूर जाऊन कार्यकर्त्यांना डावलण्यात, स्वतःचे खिसे भरण्यात, प्रत्येक गावात पक्षाचे दोन गट उभे करण्यात व दडपशाही करण्यातच पक्षातील लोक व्यस्त असल्याचे मागील दहा वर्षांपासून दिसून आले. गावागावात दोन गट उभे करून आपापसातच वाद लागल्यामुळे पक्षाचेही खूप नुकसान झाले. पक्षाचे नियम व ध्येयधोरणे हे अस्तित्वातच नाहीत असे चित्र तालुक्यामध्ये झाले आहे.

माझ्या या प्रवासात मला एवढे मोठे करणाऱ्या माझ्या सर्व जिवाभावाच्या सहकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा मी आजन्म ऋणी असेल. स्वाभिमान जपण्यासाठी मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
—-
शरद पवारांच्या पक्षात जाणार
भाजपचे निष्ठावान व ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून दिलीप खोडपेंची जामनेर मतदारसंघात ओळख होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते पक्षाच्या कार्यक्रमांपासूनही स्वत:ला अलिप्त ठेवत होते. भाजपच्या राजीनाम्यानंतर खोडपे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे मानले जाते. येत्या २१ सप्टेंबरला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जामनेरला हो प्रवेश सोहळा होईल, असेही वृत्त आहे.