एकनाथ खडसेंची होणार घरवापसी? अमित शहांच्या भेटीची चर्चा
जळगाव, २४ सप्टेंबर २०२२: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा (amit shah)यांची भेट घेतल्याचा दावा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काही दिवसापूर्वी केला होता. हा दावा खरा ठरला आहे. त्याला एकनाथ खडसे यांच्या स्नुषा व भाजप खासदार रक्षा खडसे यांनी दुजोरा दिला आहे.
एकनाथ खडसे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याने सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी एकनाथ शिंदेंची दिल्लीत अमित शहांशी भेट झाली नाही, मात्र फोनवरुन चर्चा झाली, असं सांगितलं. त्यामुळे खडसे हे आता भाजपमध्ये जाणार का, अशा चर्चां समाजमाध्यमांवर रंगल्या आहेत. राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीतील आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जाहीर सभेत भाषण करताना एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतल्याचा दावा केला होता. खडसे-शहा यांच्या काय चर्चा झाली, हे मात्र, अद्याप गुलदस्त्यात आहे. पण, खडसे हे भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे.
“खडसे यांची फोनवरुन अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली आहे. यावरुन लोकांना राजकारण करायचं असेल तर, ते करणारच,” असा टोलाही रक्षा खडसे यांनी नाव न घेता आमदार चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. यावर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मी भाजपात व नाथाभाऊ राष्ट्रवादी..
एकनाथ खडसे यांची अमित शहांची भेट झाली का याबाबत खासदार रक्षा खडसे यांना विचारले असता , त्या म्हणाल्या की , अमित शहांची भेट घेण्यासाठी एकनाथ खडसे व मी दिल्लीत गेले होते, मात्र व्यग्र कार्यक्रमामुळे अमित शहांची भेट झाली नाही . मात्र यानंतर एकनाथ खडसे यांनी अमित शहा यांच्याशी फोनवरुन चर्चा केली , असं त्या म्हणाल्या . काय चर्चा झाली आहे असे विचारले असता , रक्षा खडसे यांनी उत्तर देणे टाळले . तसेच खडसे भाजपमध्ये परतणार आहे का असे विचारले असता , मला तर माहित नाही , मात्र आता तरी मी भाजपात व नाथाभाऊ राष्ट्रवादी असल्याचेही त्या म्हणाल्या .
अमित शहांना भेटू नये, असा काही नियम आहे का?
“नरेंद्र मोदी हे या देशाचे पंतप्रधान आहेत, अमित शहा हे या देशाचे गृहमंत्री आहेत. अमित शहांना भेटू नये, असा काही नियम आहे का? माझा अमित शहा आणि पंतप्रधान मोदींशी परिचय आजचा नसून फार पूर्वीपासूनचा आहे. मी अमित शहांना एकदाच भेटलो असं नाही, या आधीही मी अनेकदा त्यांना भेटलो आहे आणि नंतरही भेटणार आहे. देवेंद्रजींनाही मी आधी भेटलो आणि पुढेही भेटणार आहे. त्यामुळे याचा वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही,” असं खडसे म्हणाले.