‘बंद मुट्ठी लाख की और खुल गई तो ख़ाक की’ – जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवार गटाला इशारा

मुंबई, २७ मे २०२४ : पुण्यातील कल्याणी नगर येथील अपघात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री हसन मुश्रीफ हे तिघे अडचणीत झालेले आहेत. या तिघांचे कोणा कोणा सोबत संबंध आहेत ? राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय घेण्यासाठी कोणावर दबाव आणण्यात आला? असे प्रश्न उपस्थित करत शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ‘बंद मुट्ठी लाख की और खुल गई तो ख़ाक की’ अशा शब्दात पवार गटाला इशारा दिलेला आहे. त्यामुळे येत्या काळात जोरदार राजकीय आरोप प्रत्यापण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुण्यातील पोर्श कारच्या अपघातावरून राजकीय वातावरण तापलं आहे. अपघात प्रकरणील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याचे गंभीर आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटातील आमदार सुनील टिंगरे यांचं या प्रकरणात नाव समोर आलं आहे. तसेच अल्पवयीन आरोपी मद्यधुंद अवस्थेत कार चालवत नव्हता हे सिद्ध करण्यासाठी ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिंग विभागातील दोन डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप होत असून या दोन्ही डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच न्यायालयाने त्यांना आता पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या दोन्ही डॉक्टरांचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील नेते हसन मुश्रीफांशी संबंध असून मुश्रीफांनीच त्यांना पाठिशी घातल्याचा, त्या पदांवर नियुक्त केल्याचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट अजित पवारांवर टीका केली आहे.

“अजित पवार हे पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणावर काहीही बोलताना दिसत नाहीत” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. “त्या बांधकाम कंपनीचे (आरोपीच्या वडिलांची कंपनी) कोणाकोणाबरोबर संबंध आहेत हे सर्वांना माहिती आहे. तसेच पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कार्यालय खरेदी करण्यासाठी कोणाचा दबाव होता हे देखील राष्ट्रवादीच्या लोकांना माहिती आहे”, असं म्हणत आव्हाडांनी नाव न घेता अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, पुण्यातील अपघात प्रकरण खूप गंभीर आहे. मात्र पुण्याचे पालकमंत्री अजित पवार त्यावर काहीही बोलताना दिसत नाहीत. आरोपीच्या वडिलांच्या बांधकाम कंपनीचे कोणाशी संबंध आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यातील कार्यालय विकत घेण्यासाठी कोणाचा दबाव टाकून प्रयत्न केले गेले? कोणाच्या दबावात ते कार्यालय काढून घेण्याचा प्रयत्न केला गेला? तो प्रयत्न कसा झाला? हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना चांगलंच माहिती आहे. ती कंपनी कोणकोणत्या गोष्टीत सहभागी आहे हे देखील आम्हाला माहिती आहे. त्या कंपनीचा मालक कोणकोणत्या राजकीय प्रकरणांमध्ये कसा सहभागी होता? हे सर्वांना माहिती आहे. कुठल्या साथीदाराने आपल्याला काय सांगितलेलं? किती रक्कम आणून देतो असं सांगितलेलं? हे सगळं सर्वांना माहिती आहे. मी यावर एवढंच बोलेन की ‘बंद मुट्ठी लाख की और खुल गई तो ख़ाक की’. उगाच नको तिथे जाऊन कोणीही चिमटे काढण्याचा प्रयत्न करू नये.