पुण्यातल्या प्रकरणाच्या मुळाशी जाणार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, २७ मे २०२४ : कल्याणी नगर येथील अपघातातील आरोपीचे रक्ताचे नमुने बदललेल्या प्रकरणे ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये आणखीन कोण गुंतले आहेत याचा तपास करावा अशी मागणी होत असताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहे असे सांगत तपास पुढे जाईल असे स्पष्ट केले आहे.

पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाच्या मुलाने कल्याणीनगर येथे भरधाव वेगातील पोर्से या आलिशान गाडीच्या धडकेत दोन आयटी अभियंत्यांचा जीव घेतला. या प्रकरणात त्याला अवघ्या काही तासात आरोपी मुलाला जामीन मिळाल्यामुळे संतापाची लाट उठली आहे. राज्य सरकारवर झालेल्या टीकेनंतर मात्र या प्रकरणात कडक पावले उचलण्यात आली. यामध्ये आत्तापर्यंत मुलाच्या वडील आजोबांनाही अटक करण्यात आलेली आहे.

दरम्यान या मुलाने मद्य प्राश केले होते की नाही हे तपासण्यासाठी ससून रुग्णालयात त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आलेले होते. पण फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी होळकर यांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेत झाल्यामुळेच या दोन डॉक्टरांनी रक्ताचे नमूने बदलले असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी पत्रकारांशी संवाद साधत त्यांची भूमिका स्पष्ट केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पुण्यातील घटनेत पोलिसांनी योग्य प्रकारे तपास केला आहे. पोलिसांनी योग्य प्रकार सीडीआर काढल्यामुळेच मुळापर्यंत या घटनेचे धागेदोरे असल्याचं लक्षात आले आहे. हा जो मुलगा होता, त्याचे रक्ताचे नमुने रिप्लेस करुन दुसरे नमुने घेण्यात आले होते.

मात्र, त्याचे रक्ताचे नमुने पोलिसांकडे असल्यामुळे याचा पर्दाफाश करण्यात आला. त्यामुळे, जे डॉक्टर यात सहभागी होते, त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी, पोलीस पूर्णपणे मुळाशी अन् तळाशी गेल्याशिवाय थांबणार नाही.”