फडणवीसांची नगरसेवक, आमदारांना तंबी सक्रीय व्हा नाहीतर महापालिकेचे तिकिट विसरा

पुणे, ३ मे २०२४ : लोकसभा निवडणूकांंच्या तोंडवर भाजपचे काही नगरसेवक आणि आमदार प्रचारात सक्रीय नसल्याचे समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुण्यात शहरातील आमदार तसेच सर्व माजी नगरसेवकांचा वर्ग घेतला. यावेळी प्रत्येकाने मतदारांपर्यंत पोहचा अन्यथा महापालिकेचे तिकिट विसरा, पक्षाकडे अनेक जण तिकिटासाठी तयार आहेत. असे सांगत नगरसेवकांना चांगलाच दम भरला. तसेच ही बाब आमदारांसाठीही लागू असेल असेही ते म्हणाले. कोरेगाव पार्क परिसरात ही नगरसेवकांची तातडीची बैठक घेण्यात आली. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, लोकसभा समन्वयक श्रीनाथ भिमाले यावेळी उपस्थित होते.

लोकसभा निवडणूकीसाठी भाजपकडून पुण्यात मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली असून काॅग्रेसकडून रविंद्र धंगेकर निवडणूकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे भाजपकडून कसब्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व पातळयांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून स्वत: फडणवीस पुण्यात लक्ष घालून आहेत. मात्र, गेल्या काही दिवसात शहरातील पक्षाचे काही आमदार तसेच माजी नगरसेवक प्रभागात सक्रीय नसल्याचे समोर आले आहे. याची गंभीर दखल घेत फडणवीस यांनी प्रत्येकाने कशा प्रकारे प्रचाराचे नियोजन करावे, सोसायटी भेटी, कोपरा सभा तसेच पक्षाच्या उमेदवाराची माहिती आठा दिवसांच्या आत घरोघरी पोहचविण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच जे लोकसभेसाठी काम करतील त्यांचाच विचार विधानसभा तसेच महापालिका निवडणूकांसाठी केला जाईल. हे लक्षात ठेऊनच काम करावे असा दम माजी नगरसेवकांना भरला आहे.

काम न करणाऱ्यांची माझ्यकडे यादी यावेळी फडणवीस यांनी लोकसभा निवडणूकीचे काम करत नसलेल्या १० ते १२ नगरसेवकांची यादीच आपल्याकडे आली असून त्यांच्याशी चंद्रकांतदादा व्यक्तिगत स्वरूपात बोलतील असे सांगितले. त्यानंतरही संबधित नगरसेवक पक्षाच्या प्रचारात न दिसल्यास पक्ष त्यांची योग्य दखल घेइल असा गर्भित इशाराही त्यांनी यावेळी दिला.