४० कोटीची फाईल बाहेर आल्याने कायंदे शिंदे गटात – संजय राऊतांचा दावा

नाशिक, १९ जून २०२३: शिवसेना अभेद्य रहावी असे आजही मनापासून वाटते. पण गेल्या १० महिन्यांपासून शिंदेवर टिका करणाऱ्या आमदार मनिषा कायंदे चानक शिंदेकडे कशा गेल्या हे काळाले नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. तर ४० कोटीची फाइल बाहेर आली त्यामुळे मनिषा कायंदे तिकडे गेल्याचा दावा प्रवक्ते संजय राऊत यांनी केला.

शिवसेनेचा आज ( १९ जून ) ५७ वा वर्धापनदिन आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वर्धापनदिन साजरे करण्यात येत आहेत. त्यानिमित्ताने ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेतील आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच, शिवसेना अभेद्य राहावी, अशी इच्छाही भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

“मी १९७३ साली नगरसेवक, तर १९७८ ला शिवसेनेचा गटनेता झालो. तेव्हापासून शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी बोलण्याची संधी मला दिली. नंतर महापौर, आमदार होत महाराष्ट्रात शिवसेनेचं काम केलं. पण, शिवसेना फुटली हे मनाला अजूनही पटत नाही,” अशी खंत भुजबळ यांनी व्यक्त केली.

“अचानक विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे हे शिंदे गटात कशा गेल्या कळलं नाही. कारण, १० महिन्यांपासून ते शिंदेंच्या विरोधात बोलत होत्या. त्या उद्धव ठाकरेंच्या कट्टर शिवसैनिक असल्याचं मला वाटलं. मात्र, हा प्रवाह अजूनही चालू आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आमच्या मनात कायम आहे. या दोन शिवसेनेत खरी कोण, हे लोक सांगतील.

शिवसेना फुटली याचं वाईट वाटतं. कठीण प्रसंगात बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्याबरोबर शिवसैनिक उभे राहायचे. बाळासाहेबांनी एकदा शब्द दिल्यावर पोलीस येतील, अटक होईल याची भीती नसायची. ती शिवसेना विस्कळीत झाली. मी, राज ठाकरे, नारायण राणे सुद्धा शिवसेनेतून बाहेर पडलो. पण, शिवसेना अभेद्य राहावी, ही मनापासून इच्छा आहे,” असेही भुजबळांनी म्हटलं.
ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊज म्हणाले, ‘‘४० कोटींची कुठली तरी फाईल बाहेर आली म्हणून बाई (मनिषा कायंदे) गेल्या असं मी काल व्यासपीठावर ऐकलं. मला त्याबद्दल काही माहिती नाही, मी यावर फार बोलणार नाही.