“विखे-पाटलांबरोबर यशोमती ठाकूरही भाजपात प्रवेश करणार होत्या” – रवी राणांचा खळबळजनक दावा
अमरावती, १२ सप्टेंबर २०२३: अपक्ष आमदार रवी राणा यांनी काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याबरोबर यशोमती ठाकूर भाजपात प्रवेश करणार होत्या. पण, मंत्रीपद न दिल्याने ठाकूर यांनी भाजपात प्रवेश केला नाही, असे वक्तव्य राणा यांनी केल्याने राजकारण तापले आहे.
रवी राणा म्हणाले, “विखे-पाटलांनी भाजपात प्रवेश केला, तेव्हा यादी पाहिली होती. त्यात यशोमती ठाकूर यांचंही नाव होतं. मात्र, मंत्रीपद न भेटल्याने ठाकूर यांनी भाजपात प्रवेश केला नाही. ‘कार्यकर्ता म्हणून काम करा, मंत्रीपद भेटणार नाही’ असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं.”
रवी राणा यांनी दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे यांच्यावरही टीका केली आहे. “दर्यापूरचे आमदार ( बळवंत वानखेडे ) तिवसा मतदारसंघातील आमदारांच्या ( यशोमती ठाकूर ) चपला उचलण्याचं काम करतात. जनतेनं आमदार बनवलं आहे, पण चपला कोणाच्या उचलता? नेत्यांच्या खुर्चीला लाथ मारून काम करण्याची ताकद असली पाहिजे. त्याला मर्द आमदार म्हणतात,” असं रवी राणांनी म्हटलं आहे.
“यशोमती ठाकूर यांनी कडक नोटा घेतल्या”
दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनीही यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. “लोकसभा निवडणुकीवेळी माझ्याबरोबर फिरून रवी राणांकडून यशोमती ठाकूर यांनी कडक नोटा घेतल्या. रक्ताचे आश्रू ढाळण्याचं काम ठाकूर यांनी केलं होतं,” असं टीकास्र नवनीत राणांनी सोडलं आहे.