मेधा कुलकर्णी यांना कार्यकर्त्यांनी सुनावले – ‘चंद्रकांत पाटील एक लाख मतांनी निवडून येतील तेव्हा काय कराल?’
पुणे, १२ ऑगस्ट २०२३ : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या लोकरपणाचा सोहळा थाटामाटात पार पडला. मात्र चर्चा सुरू राहिली ती माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या नाराजीचीच. कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्ट च्या माध्यमातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत पाटील हे त्यांचे राजकारण संपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. त्याला आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तर देत कुलकर्णी यांना घरचा हे दिला आहे. “तुम्ही तिकीट नाही दिले म्हणून पक्ष संघटना वाढवण्यासाठी काय काम केले आणि पुढच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील एक लाख मतांनी निवडून आल्यास त्यांच्याबद्दल तुम्ही कोणती फेसबुक पोस्ट लिहिणार असा प्रश्न या कार्यकर्त्यांनी केला आहे.
कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी याच मुद्द्यावरून स्थानिक भाजप नेत्यांवर तसेच अप्रत्यक्षपणे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
त्यानंतर आजच्या कार्यक्रमात कुलकर्णी यांना कार्यक्रमाच्या पहिल्या स्थान रांगेत स्थान देण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख करत त्यांना श्रेय दिले. त्यानंतर त्यांनी मेधा कुलकर्णी यांच्या घरी सदिच्छा भेट देखील दिली. त्यामुळे गडकरी यांनी मेधा कुलकर्णी यांना भेटून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला असला तरी पुण्यातील कोथरूडचे कार्यकर्ते मात्र चंद्रकांत पाटील यांच्या बाजूने खंबीरपणे उभे असून, त्यांनी मेधा कुलकर्णी यांचा या टीकेचा निषेध केला आहे या संदर्भातील एक फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल झालेली आहे.
सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेली पोस्ट जशीच्या तशी
आदरणीय प्रा. डॉ. मेधाताई नमस्कार,
सोशल आणि न्यूज मिडिया मध्ये आज तर आपण खूपच चमकत आहात, आपले अभिनंदन…आपण फेसबुकच्या माध्यमातून अत्यंत काळजाला भिडणारी पोस्ट लिहून माध्यमांना खुराक दिलात.तुम्ही स्वतःची गोष्ट सांगून पोस्ट संपवलीत, पण गोष्ट अर्धीच आहे.बाकी गोष्ट आता आम्हाला सांगावीच लागेल, आणि ती तुम्हाला ऐकावीच लागेल.
तर खूप अगदी २००२ पर्यंत मागे न जाता गोष्ट २०१४ पासून सुरु करू.२०१४ मध्ये आपली कोणत्याही बाजूने क्षमता नसताना व कोथरूड मध्ये अनेक सक्षम उमेदवार असताना सुद्धा ‘भाऊबीजेची ओवाळणी’ म्हणून विधानसभेची उमेदवारी मिळाली, त्यात मोदी लाटेत आपण प्रचंड मतांनी निवडूनही आलात.पुढे २०१४ ते २०१९ मध्ये आमदार म्हणून कोणती मोठी विकासकामे केलीत? २०१९ मध्ये घाई घाईत ओपन जीम सोडून कोणतेही दृश्यकाम कोथरूड मध्ये केले नाही.
बर लोकप्रतिनिधी म्हणून नापास झालात ठीक आहे.परंतु पक्ष संघटना वाढावी या साठी तरी काही प्रयत्न केले का? अजिबात नाही.उलट पक्षात २ गट कसे पडतील आणि पक्ष कमकुवत होऊन फक्त स्वतःचे महत्व कसे वाढेल हेच काम तुम्ही केले.
एककल्ली आणि अरेरावी करून पक्ष किंवा शासन चालत नसते. बर ते सगळं जाऊदे.आता तर तुमच्यावर राष्ट्रीय स्तरावरची मोठी जबाबदारी आहे, भाजपा महिला मोर्चा च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून मोठे काम करण्याची संधी आपल्याकडे आहे.
म्हणजेच पक्षानी अन्याय केला नाही हे तरी मान्य करा. त्या आघाडीवर तरी काय काम केले सांगा.पदाने मोठे व्हायचा प्रयत्न करणारे अनेक असतात, परंतु कार्याने पद मोठे करणारे जे असतात त्यांनाच पक्षात न मागता मान मिळतो.
सामाजिक कार्यात मागून मान मिळत नसतो ताई.आता हे एका PhD झालेल्या प्राध्यापिकेस कार्यकर्त्यांनी सांगणे चुकीचे आहे हे माहित असून ते पाप करतो.PhD चा प्रबंध लिहिताना त्यात ५ टॉपिक असतात, २ नंबर चा टॉपिक असतो ‘literature review’ म्हणजे जे आपण मांडणार आहोत त्यातील आधीचे वास्तव काय आहे त्याचा अभ्यास. तो आपण पोस्ट लिहिण्या आधी केला नाहीत.ताई आज पुण्यात २५० होर्डिंग वर तुमचा फोटो आहे. चांदणी चौकात जिथे कार्यक्रम आहे तिथे पक्षाच्या सर्व होर्डिंग्स वर तुमचा फोटो आहे.तरीसुद्धा प्रसिद्धीसाठी अशा पोस्ट्स फेसबुकवर लिहिण्याचा खटाटोप का?
ताई खर तर पक्षात आपल्याला अत्यंत मानाचे स्थान आहे. परंतु तुम्ही म्हणता तसे तुम्हाला डावलले जाते आहे हे गृहीत धरू.आता सांगा की असे कोणाला का डावलले जाऊ शकते?आणि तुमची बाजू घेणारा एकही जण पुढे येत नसेल तर नक्कीच बाकी कुणीतरी डावालायच्या आधी आपणच आपली झाकली मूठ सव्वालाखाची ठेऊन शांत बसणे अधिक योग्य आणि श्रेयस्कर.
आज कोथरूड भागातील नागरिक सुद्धा मान्य करतात की ताईंनी काहीतरी चुकीच केलय म्हणूनच त्यांच्यावर अशी वेळ येत आहे.ताई पुण्यात अनेक विद्यापीठे आणि शेकडो महाविद्यालये आहेत. त्यात हजारो प्राध्यापक आहेत. परंतु यांच्यातील कुणाचाही तुमच्या इतका मोठा बंगला नाही.आणि त्या बंगल्याच्या जागेचा मालक नक्की कोण?अशी कोणती ‘ऊर्जा’ आपल्याला २०१४ नंतर मिळाली ते सांगा म्हणजे तुमच्या सारखे बंगले सर्व प्राध्यापकांना मिळतील.
तसेच पक्षाच्या बैठका मतदारसंघात केंद्रस्थानी व्हायच्या त्या मतदारसंघाच्या एका बाजूच्या ‘सहकार उद्यान’ नामक बागेत घेणे का सुरु केले?त्याच ‘सहकार उद्यानामध्ये’ आपण आपले वैयक्तिक कार्यालय अजूनही कसे काय सुरु ठेवले?त्याचा ताबा का सोडला नाही?कोविड काळात कोथरूड – पुण्याच्या जनतेसाठी काय काम केल?कोथरूड मधील कोणते नागरी प्रश्न/ अडचणी सोडवल्या? पक्ष किती मजबूत केला?
तुम्ही म्हणताय ‘कोथरूडचे आधुनिक नेते’ माझे अस्तित्व संपवयला निघालेत…ताई तुमचे अस्तित्व होतेच कुणामुळे? किंबहुना होते का तरी?कोथरूडच्या अध्यक्षपद निवडीच्या प्रक्रियेत तुमचे मत घेतले नाही …. तुमचे तितके अस्तित्व किंवा पक्ष कार्य असते तर नक्कीच घेतले असते मत.तुम्ही तुमच्या राजकारणापायी कोथरूड मध्ये अनेक घरे फोडलीत, अशाच एखाद्या घरातील कार्यकर्ता जर महत्वाच्या पदावर आला तर ?
कोथरूड मध्ये २०१९ साली आपण म्हणालात ‘माझ तिकीट होत’ ताई भाजपमध्ये ‘व्यक्तीचं’ तिकीट नसतं इतकं देखील तुम्हाला कळलं नाही १५ वर्षाच्या राजकारणात.आणि त्यावेळी पक्षाच्या आणि संघाच्या विरोधात किती किती वाईट बोललात ते कार्यकर्ते विसरले नाहीत.
https://www.facebook.com/ajit.jagtap.75/posts/pfbid024dyZPyFh8Pw6igQ7FXaAV1pF4Qe9hE8MJNSZqcGzxKiUmRfb5w3dCGYt4AMBm48tl
ताई हे सगळं असूनही सांगतो, पक्षात आपल्याला खूप किंमत आहे.तुमच्या आचरणांनी तुम्ही भाजप विरोधकांची ‘useful idiot’ ठरत आहात. ‘useful idiot’ चा अर्थ गूगल करून पहा एकदा.आणि इतक सगळं असून/होऊन सुद्धा जर आपण निष्ठावंत आहात आणि आपल्याला पक्षात डावललं जात आहे असा वाटत असेल तर’राहुल गांधींच्या चपला उचलणारे’ जे आहेत त्यांच्या पक्षात जा, ते आपले चांगले स्वागत नक्कीच करतील!
आपल्या पोस्ट्स मुळे माध्यमांना पालकमंत्री व कोथरूडचे आमदार, भाजपचे नेते मा. चंद्रकांतदादा पाटील यांना टार्गेट करून २ दिवस चर्चा करण्याचा खुराक मिळेल.पण उद्या तेच १ लाखाच्या मताधिक्याने पुन्हा निवडून येतील तेंव्हा मात्र तुमची खूप कुचंबणा होईल. अशा फेसबुक पोस्ट्स लिहून आपण पक्षाचे आणि त्याहीपेक्षा जास्त स्वतःचे नुकसान करून घेत आहात.
शूर्पणखा जर वाईट हेतू ठेऊन रामाच्या वाकड्यात गेली नसती, तर तिचे नाक कापले गेले नसते…धारदार नाक असलेल्यांनी नाकाची जास्त काळजी घेतली गेली पाहिजे, निदान कापले जाण्याआधी…- भाजपा कोथरुड कार्यकर्ता