शिवसेनेचा रुसवा काढण्यासाठी राहुल गांधी मातोश्री वर जाणार ?
मुंबई, १४ एप्रिल २०२३ : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे लवकरच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतील अशी शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्यात बैठक पार पाडली. भाजपा विरोधात विरोधक एकत्र येण्यास सुरूवात झाली असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. दिल्लीत ही घडामोड घडल्यानंतर आता राहुल गांधी हे मातोश्रीवर येण्याची शक्यता आहे. असं झालं तर मातोश्रीवर येणारे ते पहिलेच नेते ठरतील. ही भेट होणार का? याची तारीख काय असेल? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मोदी आडनावाचे लोक चोर का असतात? हा प्रश्न राहुल गांधींनी विचारला होता. त्यांच्या विरोधात गुजरातमध्ये खटला भरला होता. याची सुनावणी करताना कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व गेलं. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मी माफी मागणार नाही माझं आडनाव गांधी आहे सावरकर नाही असं राहुल गांधी म्हणाले होते. वीर सावरकर यांच्यावर यााधीही राहुल गांधींनी टीका केली. अशात आता राहुल गांधी या सगळ्या प्रकरणाचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मातोश्रीवर येण्याची शक्यता आहे असं बोललं जातं आहे.
काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्या भूमिकेमुळे, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत आलबेल नसल्याच्या चर्चा आहेत. विशेषतः ठाकरे गट नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही बोललं जात होतं. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंची भेट त्यासाठीच होत असल्याच्याही सध्या चर्चा रंगल्या आहेत.
राहुल गांधी हे लवकरच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटण्याची दाट शक्यता आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट होण्याची दाट शक्यता आहे. मातोश्रीवरच ही भेट होईल असं सूत्रांनी सांगितलं आहे. या भेटीत स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचे सूत्र यासह विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप