दिल्लीपुढे झुकणार नाही – युगेंद्र पवार
बारामती, २३ फेब्रुवारी २०२४: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांनी अजित पवारांना सोडून शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. मात्र २०२३ मध्ये या पक्षात फूट पडली. अजित पवार एक मोठा गट घेऊन वेगळे झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवारांना मिळालं आहे. या सगळ्यानंतर युगेंद्र पवार यांनी शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी जी पोस्ट केली आहे ती आता चर्चेत आहे.
शरद पवारांच्या गटाला तुतारी हे पक्षचिन्ह मिळाल्यानंतर आज युगेंद्र पवार यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. या फेसबुक पोस्टने लक्ष वेधलं आहे. युगेंद्र पवार यांनी शरद पवारांबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. त्याला त्यांनी कॅप्शन दिली आहे ‘दिल्लीपुढे न झुकण्याचा छत्रपती शिवरायांनी शिकविलेला स्वाभिमानी बाणा जपण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. जय जिजाऊ, जय शिवराय.’ अशी पोस्ट युगेंद्र पवार यांनी केली आहे. जी चांगलीच चर्चेत आहे.
युगेंद्र पवार यांची फेसबुक पोस्ट बारामती लोकसभा मतदारसंघावरून पवार कुटुंबीयांत आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. अजित पवार यांनी पहिल्यांदा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केल्यानंतर आता ते स्वतः बारामती पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. इतकंच नव्हे, तर पत्नी सुनेत्रा पवार यांनी सुद्धा आता बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत वातावरण तापवण्यास सुरुवात केली आहे.
शरद पवार कुटुंबात पहिली राजकीय ठिणगी ही बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये पडणार आहे. अजित पवार सातत्याने मला कुटुंबांकडून एकटे पाडले जाईल, तुम्ही एकटे पाडू नका अशा प्रकारची वक्तव्ये बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये करत आहेत. त्याला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आता येत्या काळात काय घडतं? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.