सज्जनपणाचा आव आणणाऱ्या भाजपकडून सोमय्यांवर कारवाई का नाही- ठाकरे गटाचा हल्लाबोल
मुंबई, १९ जुलै २०२३: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडीओवरून पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. साधनसुचितेचा पक्ष म्हणून मिरवणाऱ्या भाजपाने अद्यापही किरीट सोमय्यांवर कारवाई केलेली नाही अशी टीका दानवे यांनी केली.
विधिमंडळाच्या बाहेर दानवे यांनी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
अंबादास दानवे म्हणाले, “मी विधान परिषदेत पेन ड्राईव्ह दिला आहे. त्या पेन ड्राईव्हमधील माहिती सभापती तपासतील. मी त्याची तपासणी केली आहे. सुरक्षिततेच्या आणि सामाजिक हिताच्या दृष्टीने हे उघड करणं योग्य होणार नाही. माझ्याकडे अनेकांनी हा पेनड्राईव्ह मागितला आहे. मात्र, मी सभापती सोडून इतर कुणालाही हा पेनड्राईव्ह दिलेला नाही. भाजपा साधनशुचितेचा पक्ष म्हणून मिरवतो. जर असं कृत्य सामान्य कार्यकर्त्याने केलं असतं तर भाजपाने आतापर्यंत त्याला पक्षातून काढलं असतं. मात्र, भाजपाने किरीट सोमय्यांवर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. पोलीस त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करतील. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तसे आदेश दिले आहेत.
साधनसुचिता, संस्कृती, धर्म मानणाऱ्या भाजपानेही किरीट सोमय्यांवर कारवाई केली पाहिजे,” अशी मागणी अंबादास दानवेंनी केली.
“सभागृहात मुंबईतील एका वसतिगृहात मुलीचा बलात्कार आणि खून झाला त्याचा विषय मांडण्यात आला. सगळ्या घटना बघितल्या तर महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्राचा क्रमांक वरती येतो आहे. हे लांच्छनास्पद आहे. सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर आणि जिजाऊंच्या महाराष्ट्रात लाजिरवाणी स्थिती निर्माण झाली आहे. गुन्हेगारांना वचक, धाक राहिलेला नाही. पुणे, ठाण्यासह अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या. देशात महाराष्ट्र महिलांवरील अत्याचाराबाबत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. महाराष्ट्र बालगुन्हेगारीत सहाव्या क्रमांकावर आहे. सरासरी सर्वच गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. आधी महाराष्ट्राचा विकासात क्रमांक वर येत होता, आता गुन्हेगारीत येतो आहे. याला कारण कायद्याचा गुन्हेगारांवर धाक राहिला नाही. हे सरकार ही शाखा ताब्यात घे, तो पक्ष ताब्यात घे यात गुंतलं आहे आणि गुन्हेगारांना मोकाट सोडतं आहे. यावर सरकारकडून कारवाई अपेक्षित आहे,” असंही दानवेंनी नमूद केलं.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप