महाराष्ट्रातील भ्रष्टाचार्यांना मांडीवर घेऊन का बसता? – संजय राऊत यांचा भाजपला सवाल
मुंबई, २४ ऑक्टोबर २०२३: छत्तीसगडमध्ये भ्रष्टाचाऱ्यांना उलटं लटकवता मग महाराष्ट्रात भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेऊन पप्पी का घेता? असा खोचक सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबईतील शिवतीर्थावर आज ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यातून संजय राऊतांनी भाजपवर टीकेची तोफ डागली आहे.
संजय राऊत म्हणाले, देशात सध्या पाच राज्यांच्या निवडणुका लागल्या आहेत. या निवडणुकीच्या प्रचारसभेत छत्तीसगडमध्ये अमित शाह म्हणतात, छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता आल्यास आम्ही भ्रष्टाचाऱ्यांना उलटं लटकवू. छत्तीसगडमध्ये भ्रष्टाचाऱ्यांना उलटं लटकवता मग महाराष्ट्रात मांडीवर घेऊन पप्पी का घेता? असा खोचक सवाल संजय राऊतांनी भाजपला केला आहे.
भ्रष्टाचाऱ्यांना उलटं लटकवायची असेल तर महाराष्ट्रातून सुरुवात करा, महाराष्ट्रात भ्रष्ट मार्गाने आलेलं सरकार सत्तेत आहे. ते 40 आमदार 50 खोके घेऊन फुटले तो भ्रष्टाचार तुम्हाला दिसत नाही. त्या 40 आमदारांना उलटं लटकवा आम्ही शिवतीर्थावर सत्कार करु, असंही ते म्हणाले आहेत.
ड्रग्स प्रकरण: मी एक आई म्हणून गृहमंत्र्यांकडे न्याय मागते, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
तसेच बाळासाहेबांनी धगधगते निखारे तयार केले आम्ही ते निखारे आहोत. ज्यांचा विझून कोळसा झाला ते पळून गेले आम्ही पळणारेतले नाहीत. “जो उडने का शौक रखते हे, वो उडने का ख्वाब नहीं रखते” तुमच्या दबावाला आम्ही घाबरत नाही भाजप अन् भ्रष्टाचार हा एक शिष्टाचार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात म्हणतात किसी भ्रष्टाचारी को नही छोडूंगा… सबको पकड-पकडकर भाजप में सामिल करुंगा… हाच भाजप देशावर महाराष्ट्रावर राज्य करतोयं. भाजपच्या दुतोंडीपणाचं आणि ढोंगीपणाचं आश्चर्य वाटत असल्याचंही ते म्हणाले आहेत.
अजितदादांवर टीकास्त्र :
भोपाळमध्ये आयोजित कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अजित पवार यांच्या सिंचन घोटाळा आणि बॅंकेच्या घोटाळ्याबद्दल बोलतात. त्यानंतर लगेचच चार दिवसांनंतर अजित पवार भाजपसोबत सत्तेत सामिल होऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असल्याचं ते म्हणाले आहेत