एक्स्प्रेस वे महामार्गावरील ४६००० वृक्ष गेली कुठे? आपच्या मुकुंद किर्दत यांचा राज्य शासनावर आरोप
पुणे, १९ ऑगस्ट २०२२: पुणे मुंबई एक्स्प्रेस महामार्गाची चर्चा सुरु झाली तेव्हा पर्यावरणप्रेमींनी खूप आक्षेप घेतले होते. मुख्यत्वे सह्याद्री घाटातून हा रस्ता जात असल्याने मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोड होणार होती . वन्यजीव हानी , गावांची विभागणी आणि संपर्क रस्ते अडचणी , मोकळ्या होणार्या दरडी आदी प्रश्न होते. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार असल्याने एक लाखापेक्षा जास्त वृक्ष लावले जातील व त्याचे संवर्धन केले जाईल असे आश्वासन शासनाकडून दिले गेले. तेव्हा मोठी आश्वासने देण्यात नितीन गडकरी पुढे होते. परंतु हे आश्वासन पाळलेच गेले नसल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी आज केला आहे.
माहिती अधिकाराचा वापर करीत मुकुंद किर्दत यांनी २०१७ पासून वृक्ष लागवडीची स्थिती माहित करून घेत होते. हा एक्स्प्रेस महामार्ग बांधणी व त्याची देखभाल आणि त्या बदल्यात टोल जमा करण्याचे कंत्राट आयडीअल रोड बिल्डर्स या कंपनीला देण्यात आले. या २००५ मधील कंत्राटानुसार महामार्गाची देखभाल करताना या ९३ किमी एक्स्प्रेसवे महामार्गाच्या दोन्ही बाजूस मिळून १ लाख वृक्ष लावण्याची जबाबदारी या क्म्पनीवर होती. हे काम दोन वर्षात पूर्ण करायचे होते. आयडिअल रोड बिल्डर शी झालेल्या करारात या बाबी आहेत.
या कंत्राटानुसार यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस महामार्ग व जुन्या एमएच४ मार्गावर देखभाल करताना ‘एकट्या एक्स्प्रेस रस्त्यावर १ लाख वृक्ष लागवड व त्यातील किमान ८०,००० वृक्ष चांगल्या स्थितीत असणे बंधनकारक होते. परंतु नंतरच्या देखभाल कंत्राटात एक्स्प्रेस वे व जुना महामार्ग यावर मिळून किमान ८०००० वृक्ष असायला हवे असा अर्थ लावला गेला.
गेल्या सतरा वर्षातील वृक्ष लागवड व मोजणी बाबत मिळालेल्या माहिती नुसार ची वृक्ष स्थिती पुढील प्रमाणे आहे.
· २००५ मध्ये एक्स्प्रेस वे वर १,००,००० वृक्ष लागवड केली गेली.
· २००११ अखेरीस एक्स्प्रेस वे वर १,०३,४५५ वृक्ष अस्तित्वात होते.
· २०१२ मध्ये जुन्या महामार्गावर १५००० अधिक एक्स्प्रेस वे वरचे ६८२९२ असे एकूण ८३२९२ वृक्ष, म्हणजे एक्स्प्रेस वे वरचे लागवडीपैकी ३५१६३ वृक्ष कमी असल्याचे नोंदवले गेले आहे.
· २०१४ ते २०१६ अखेर जुन्या महामार्गावर १५००० अधिक एक्स्प्रेस वे वरचे ८०१७६ असे एकूण ९५,१७६ वृक्ष,
· तर २०१७ अखेरीस जुन्या महामार्गावर १३,००० व एक्स्प्रेस वे वरचे १,०२,१७६ असे एकूण १,१५,१७६ वृक्ष अशी वृक्ष गणना असल्याची माहिती देण्यात आली.
तर २०१९ अखेरीस जुन्या महामार्गावर १५,४२६ व एक्स्प्रेस वे वरचे ७१,८२६ असे एकूण ८७,२५२ वृक्ष अशी वृक्ष गणना असल्याची माहिती देण्यात आली.
प्रत्यक्ष एक्स्प्रेस हाय वे वर दिसणारी स्थिती फारशी चांगली नव्हती . काही भागात नजरी मोजणी केली असता हा वृक्षगणती चा आकडा फुगवला असल्याचे वाटत असल्याने या बाबत पाठपुरावा केला असता जुलै २०२२ मध्ये माहिती अधिकारात MSRDC कडून मिळालेल्या आकडेवारीनुसार दोन्ही रस्त्यावर एकूण ६४,०३५ इतकेच वृक्ष अस्तित्वात असल्याचे पुढे आले आहे.
म्हणजे ९३ किमी च्या एक्स्प्रेस व त्यापेक्षा अधिक लांबीचा जुना महामार्ग या दोन्ही रस्त्यावरची *एकत्रित वृक्षआकडेवारी १,१५,१७६ वरून ६४,०३५ पर्यंत खाली आली असल्याचे दिसते आहे. प्रत्यक्षात ही वृक्ष संख्या याहूनही कमी असावी अशी शंका आहे. आता हे ५ वर्षात कमी झालेले ४६००० वृक्ष गेले कुठे?
रस्ते , महामार्ग या बाबत मानके , दर्जा , संशोधन देवाण घेवाण करणाऱ्या भारतीय रोड कॉंग्रेस या संस्थेच्या मार्गदर्शक तत्वानुसार ( IRC ) किमान एक किमी रस्त्यामागे ६६६ वृक्ष तर नव्या IRC –SP २१ प्रमाणे एक किमी रस्त्यावर ९९९ वृक्ष असणे अपेक्षित आहे. हरित महामार्ग निधी म्हणून सिव्हील कामाच्या १ टक्के रक्कम या वृक्ष लागवडीसाठी प्रकल्प रकमेत गृहित धरली जाते. असे असतानाही या महामार्गावर पुरेशी वृक्ष लागवड आणि देखभाल केली गेलेली नाही . महामार्ग विकासा ऐवजी कॉरीडॉर ही संकल्पना पर्यावरणाचा अधिक व्यापक विचार करते परंतु प्रत्यक्षात त्याचा फारशी अंमल बजावणी केली जात नाही. पुणे मुंबई एक्स्प्रेस वे वर १००००० वृक्ष लागवड व त्यातील किमान ८०००० वृक्ष सुस्थितीत अपेक्षित असताना आज अखेर केवळ ४९०३५ वृक्ष नोंदवले गेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रकल्पातील ‘पर्यावरणीय जबाबदारी’ हाही एक जुमला ठरत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी म्हंटले आहे.
सध्या एक्स्प्रेस महामार्गावर ‘मिसिंग लिंक’ हा १३.३ किमी रस्ता तयार होत असताना ५३०० वृक्ष कापले जाणार आहेत व त्या बदल्यात ४८००० वृक्ष लावले जाणार आहेत. तसेच पुण्यात बालभारती टेकडी रस्त्याची तर मुंबईत गोरेगाव मेट्रो प्रकल्पावरून विविध चर्चा चालू असताना शासन या एकस्रेस महामार्गावरील अनुभवातून काही शिकणार का हा प्रश्न निर्माण होतो आहे. शासन आतातरी गंभीरपणे पर्यावरण या विषयाकडे पहाणार का असा प्रश्न मुकुंद किर्दत यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. या वेळेस आपचे सतीश यादव,दिनेश चौधरी,अक्षय शिंदे,शंकर थोरात आदी उपस्थित होते.