“निवडणूक आली की रुग्णालयाचा विषय मागे पडायचा” – शिवसेनेच्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले भाऊक

मुंबई, १९ जून २०२३: शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह मिळाले आहे. त्यानंतर आजचा शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन त्यांच्यासाठी विशेष ठरला आहे. त्यानिमित्याने शिंदे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. वर्धापन दिनाच्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केलीच पण वैयक्ती अडचणी सांगताना भाऊक झाले. मुलगा श्रीकांत शिंदे एमबीबीएस झाल्यानंतर रुग्णालय टाकून द्या अशी मागणी केली पण निवडणूक आल्या की पैसा लागायचा आणि रुग्णालयाचा विषय मागे पडला अशी आठवण यावेळी शिंदे यांनी सांगितली.

एकनाथ शिंदे भाषणात म्हणाले, “मला आठवतंय श्रीकांत डॉक्टर झाला. एमबीबीएस झाला. सर्जन झाला. त्याने मला एकच गोष्ट मागितली. मला रुग्णालय बांधून द्या, असं तो म्हणाला. पण मी तुम्हाला सांगतो, त्याचा बाप त्याला रुग्णालय बांधून देऊ शकला नाही. रुग्णालय बांधायचा विचार करायचो, तेव्हा कुठली तरी निवडणूक यायची. मग रुग्णालयाचा विषय मागे पडायचा.”

“ह्या एकनाथ शिंदेंनी कर्ज काढून निवडणुका लढवल्या आहेत. निवडून आल्यानंतर आम्ही निवडलेली माणसं घेऊन मातोश्रीवर जायचो. त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल द्यायचो. हे माझ्या नेतेमंडळींनाही माहीत आहे. मी पक्षात मिळेल ते काम केलं. कष्ट केलं. वयाच्या २१ व्या वर्षी मी बेळगावच्या तुरुंगात ४० दिवस होतो. माझ्यावर कितीतरी केसेस झाल्या. अनेक वेळा तुरुंगवास झाला. पण तुम्ही (उद्धव ठाकरे) काय केलं? व्यासपीठावर बसलेल्या आमच्या नेत्यांनीही तेच भोगलंय म्हणून शिवसेना मोठी झाली,” असंही एकनाथ शिंदे म्हणाले.