“रात्री पाऊस पडल्यावर सकाळी लगेच पंचनामे होतात का” – फडणवीस यांची विरोधकांवर टीका
पुणे, ११ मार्च २०२३ः ‘‘पाऊस रात्री पडला तरी सकाळी ते पंचनामा झाला नाही म्हणून गोंधळ घालत आहेत. एवढ्या वेगाने पंचनामा त्यांनी तरी कधी पाहिला आहे का ? अतिवृष्टी सारख्या इव्हेंट आहेत, त्यामध्ये संवेदनशिल असले पाहिजे, त्याचे राजकारण करणे योग्य नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
देवेंद्र फडणवीस हे पुण्यात आले असता त्यांनी लोहगाव विमानतळ येथे पत्रकारांशी संवाद साधला.
राज्यातील विविध जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पंचनामे झाले नसल्याची टीका केली जात आहे. त्यासंदर्भात विचारले असता फडणवीस म्हणाले, दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला आहे, त्याचे पंचनामे आता सुरू झाले आहेत. हे काम पूर्ण होण्यास त्याला थोडा काळ तरी लागणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी शेताचा फोटो काढला तरी आम्ही तो पंचनामा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. मला तर याचे आश्चर्य वाटते की आम्ही विरोधकांच्या काळातील पैसे आता आता देत आहोत. आणी हेच आता पंचनामे झाले नाहीत म्हणून गोंधळ घालत आहेत.
कसब्याचे पोस्टमार्टम केले
कसबा विधानसभा पोट निवडणुकीत पराभव झाला, त्याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, ‘‘एखादी निवडणूक जिंकतो किंवा हारतो त्यामुळे फार काही फरक पडतो असे मी मानत नाही. पण प्रत्येक निवडणुकीनंतर विजयाचे किंवा पराजयाचे आम्ही मूल्यमापन करतो. दुसऱ्या भाषेत सांगायचे झाले तर त्याचे पोर्टमॉर्टम करतो. कसब्याबाबत ते आम्ही केले आहे. त्यानुसार भविष्यात जी काळजी घ्यायची आहे ती योग्य पद्धतीने घेऊ.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप