मनसेच्या शाॅडो कॅबिनेटचे काय झाले ? त्यावर राज ठाकरे स्पष्टच बोलले
नाशिक, २० मे २०२३ : “माझ्या हातात सत्ता द्या महाराष्ट्राला सुतासारखा सरळ करतो” असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका सभेमध्ये केलेले होते. राज ठाकरे यांचे राज्यात सत्ता आलीच नाही पण कसाबसा एक आमदार निवडून आलेला आहे. सरकारच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांची शाॅडो कॅबिनेट तयार केली, पण ही शाॅडो कॅबिनेट अवघ्या काही महिन्यातच मृत अवस्थेत गेली. गेल्या तीन वर्षांपासून तिचे कामकाज देखील ठप्प आहे. आताही शाॅडो कॅबिनेट पुन्हा एकदा कार्यान्वीत केली जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी तेथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना
शाॅडो कॅबिनेटचं काय झालं? ती कॅबिनेट फक्त महाविकास आघाडीकरताच होती का? असा प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, “या सरकारसाठी वेगळी शाॅडो कॅबिनेट, त्या सरकारसाठी वेगळी, असं काही नाही. शाॅडो कॅबिनेट जाहीर केल्यानंतर महिन्याभरात लॉकडाऊन लागले. त्यामुळे दोन वर्षे काही करता आलं नाही. ती कार्यान्वित होईल,” असं राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारवर देखरेख करण्याकरता शाॅडो कॅबिनेट पुन्हा कार्यान्वित होणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी जाऊन गाठीभेटी घेत आहेत. ते आज नाशिक दौऱ्यावर असून तेथील पदाधिकाऱ्यांशी आज चर्चा करणार आहेत. पक्षसंघटन बळकट करण्याकरता ते पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. नाशिकमध्ये आम्ही जेवढं काम केलं, तेवढं याआधीही झालं नव्हतं आणि त्यानंतरही झालं नाही, असा आरोपही राज ठाकरे यांनी यावेळी केला.