‘लग्नाचा हनिमून अजूनही सुरुच’; सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका
पुणे, २४ आॅगस्ट २०२२: ‘लग्नाचा हनिमून अजूनही सुरुच’; सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका
पुणे- मुंबईतील विधानभवन परिसरात मंगळवारी ५ जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यावरून आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. ‘५० खोके ऑल ओके’वाल्या या सरकारला सर्वसामान्यांची सेवा करण्याची इच्छा नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
सध्यातील सरकारमधील लोक कार्यक्रम सोडतील तर जनतेची सेवा करतील ना…हे एवढे सेलिब्रेशन करण्यात येवढे मग्न आहेत की, बस्ता बांधला..त्यानंतर लग्न केलं..मात्र लग्नाचा अजूनही हनिमून सुरु आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. तसेच ५० खोके ऑल ओके, सर्वसामान्य माणूस मात्र नॉट ओके, असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. तसेच मूळ मुद्द्याला बगल देण्याची भाजपची जुनी खेळी असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सरकार स्थापन होऊन एक महिना झाला मात्र अद्याप पुणे जिल्ह्यासह राज्याला पालकमंत्री नाही. पालकमंत्री अभावी राज्याचा विकास ठप्प झाला आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा असताना सर्व दृष्टिकोनातून कामकाजाचे निर्णय तत्परतेने घेतले जात होते. मात्र आता पालकमंत्र्यांअभावी विकास कामाचे निर्णय प्रलंबित झालेले आहे असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, महाआघाडीचे सरकार पाडण्यासाठी घाई केली मात्र सरकार पाडण्यासाठी इतर राज्याची मदत घ्यावी लागली ही शोकांतिका म्हणावी लागेल . सरकार स्थापन झाल्यानंतर एक महिन्यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना झाली. हे मायबाप सरकार आहे आलिया भोगासी असेच या सरकार बद्दल म्हणावे लागेल, अशी टाकाही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.