भाजप तोडण्याचं अन आम्ही जोडण्याचं काम करतो – राहुल गांधी

शेगाव, १८ नोव्हेंबर २०२२ – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शेगावात जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मनातील दु:खं समजलं पाहिजे. हजारो युवक मिळतात. इंजिनीअर, वकील, आर्मीमध्ये सहभागी व्हायचं आहे. युवकांच्या आई-वडील विद्यपीठात पाठवितात. पण, महाराष्ट्रात शिक्षण मोफत मिळत नाही. लाखो रुपये खर्च करावे लागतात.

राहुल गांधी म्हणाले, रस्त्यात युवक म्हणतात, शिकले. मेकॅनिकल इंजिनीअर झाले. पण, त्यांना नोकरी मिळत नाही. कुणी चालक म्हणून काम करतात. तर कुणी मजुरी करतात. मोठ्या उद्योगपतींच्या हातात पैसे जातात. युवकांचं स्वप्न पूर्ण होत नाही. असा हिंदुस्थान आम्हाला नको. दोन-तीन उद्योगपती देशातील पैसे घेऊन जातात. असा हिंदुस्थान आम्हाला नको आहे. हे आम्ही होऊ देणार नाही, असंही राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितलं.

शेतकरी दु:खी, युवक दु:खी, त्यांचे पालक दु:खी आहेत. त्यांना भाजप भीती दाखविते. भावाला भावासोबत लढविलं जातं. कुटुंबात आपसी वादानं कुणालाही फायदा होत नाही. मग, देशाला कसा फायदा होईल. देशसुद्धा एक कुटुंब आहे. लाखो कुटुंबानं देश बनतो, असंही राहुल गांधी यांनी सांगितलं.

छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, गाडगे महाराज, सत्य साई बाबा या महापुरुषांची यादी आहे. हे सर्व महापुरुष या भूमीत होऊन गेले. यापैकी कुणी सांगितलं का की, हिंसा पसरवा, भीती दाखवा. नाही ना. पण, भाजप तोडण्याचं काम करते. आम्ही जोडण्याचं काम करतो, असंही राहुल गांधी यांनी म्हंटलं.

शिवाजी महाराज यांनी जगाला मार्ग दाखविलं. आई मुलाला रस्ता दाखविते. शिवाजी महाराज यांना जिजाऊ यांनी तयार केलं. ते फक्त व्यक्ती नव्हते. तर ते महाराष्ट्राचा आवाज होते. त्यांना मार्ग दाखविण्याचं काम त्यांच्या आई जिजाऊ यांनी केलं. महापुरुषांनी म्हटलं, तेच काम ही यात्रा करत आहे, असं सांगायला राहुल गांधी विसरले नाही.