विशालगडाचा अतिक्रमणाचा वाद धर्माच्या पलिकडे: छत्रपती संभाजी यांची भूमिका
पुणे, १६ जुलै २०२४ः विशालगडावर मांसाहार केला जात होता, दारूच्या पार्ट्या होत होत्या. तेथील अतिक्रमण काढून टाकावे यासाठी गेल्या दीड वर्षापासून शिवभक्त मागणी करत होते. हा हिंदू आणि मुस्लीम असा वाद नाही, हा विषय धर्माच्या पलिकडे आहे. आज केलेल्या अतिक्रमण कारवाईत पहिली कारवाई हिंदूंवर झाली आहे. त्यामुळे मी पुरोगामित्व सोडलय म्हणणाऱ्यांनी विशालगडाच्या संवर्धनासाठी काय केले? अशी टीका माजी खासदार छत्रपती संभाजी यांनी केली.
पुणे श्रमिक पत्रकार संघात ते बोलत होते. यावेळी धनंजय जाधव आदी उपस्थित होते.
छत्रपती संभाजी म्हणाले, ‘‘विशालगडावरील अतिक्रमण कारवाईचा निर्णय स्थानिक प्रशासनाच्या हातात नव्हता, म्हणून मुंबईत बैठक घेण्याची मागणी करत होतो. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यासीन भटकल सारखा दहशतवादी सात दिवस किल्ल्यावर राहून गेला. तेथे अनेकजण येऊन पार्ट्या करत होते. तरीही प्रशासनाने लक्ष दिले नाही. पालकमंत्री हसीन मुश्रीफ, माजी मंत्री सतेज पाटील यावर काहीच बोलत नाहीत. म्हणून शिवभक्तांनी आक्रोश व्यक्त केला.
गजापूर येथे झालेल्या जाळपोळीचे समर्थन मी कधीही करणार नाही. पण कारवाईला उशीर झाला, वेळीच अतिक्रमण पाडले असते तर ही वेळच आली नसती. किल्ल्यावर कारवाई सुरु झाली असून, दोन दिवसात सुमारे १०० अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहेत. हा विषय धर्माच्या पलिकडे आहे, गडकोट अतिक्रमण मुक्त झाले पाहिजेत. इतर किल्ल्यावर हे कारवाईचे धाडस दाखविले पाहिजे. खासदार शाहू महाराज, प्रकाश आंबेडकर हे माझ्याबद्दल काय बोलले आहेत हे मला माहिती नाही. मी पुरोगामित्व सोडलय असे म्हणणाऱ्या सतेज पाटील, मुश्रीफ कधी किल्ल्यावर गेले आहेत. कोल्हापुर जिल्ह्यातील किल्ल्यांसाठी तुम्ही काय केले आहे? असा प्रश्नही छत्रपती संभाजी यांनी उपस्थित केला.