विखे म्हणतात ‘तांबे भाजपात येणार अन केसरकर म्हणतात भाजपमध्ये जाणार नाहीत

पुणे, २ फेब्रुवारी २०२३ ः नाशिक पदविधर विधान परिषद निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासात जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच तांबे यांचे विजयाचे पोस्टर पुण्यात लागले आहेत. तांबे आमदार झाले तरी ते भाजपमध्ये यावेत यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रयत्नात आहेत, तसे त्यांनी स्पष्टही केले आहे. मात्र, शिंदेगटाचे प्रवक्ते, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मात्र तांबे भाजपमध्ये जाणार नाहीत, असा दावा केल्याने तांबेंचे काय होणार अशी चर्चा रंगली आहे.

राज्यात आज शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या मतमोजणीची जोरदार चर्चा सुरू आहे. आज सकाळपासूनच या जिल्ह्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. कोकणात भाजपानं विजयाता नारळही फोडला असून ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील बदलत्या समीकरणांची विश्लेषकांमध्ये चर्चा सुरू झालेली असतानाच दुसरीकडे बंडखोर अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्यजीत तांबेंनी भाजपामध्ये प्रवेश करण्याबाबत सूचक विधान केलं होतं. “सत्यजितचा विजय निश्चित आहे. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करावा यासाठी आमचा आग्रह राहणारच आहे”, असं म्हणत तांबेंना राधाकृष्ण विखे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भाजपामध्ये येण्याचीच ऑफर दिली आहे.

या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी यासंदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांना विचारणा केली असता केसरकरांनी यावर सूचक शब्दांत प्रतिक्रिया देत तांबेंच्या भाजपा प्रवेशाची शक्यता नाकारली आहे.

केसरकर म्हणाले, “सत्यजीत तांबे भाजपामध्ये जाणार नाहीत. मी एवढंच सांगितलं की तांबे कुठल्या पक्षात गेलेले नाहीत. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज केला आहे ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा तुम्ही विधानपरिषदेत अपक्ष म्हणून राहता, त्यानंतर तुम्ही कुठल्या पक्षात जाऊ शकत नाहीत. तुम्ही एखाद्या पक्षाला पाठिंबा देऊ शकता. तांबे निवडून येतील अशी मला १०० टक्के खात्री आहे”, असं केसरकर म्हणाले.