वेदांत वाचस्पती पूज्यश्री जगन्नाथ महाराज पवार यांचे कार्य समाजाला दिशा देणारे — उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पंढरपूर, 04 नोव्हेंबर 2022: वारकरी संप्रदायाने समाजामध्ये संस्कार रुजविले असून काव्यतीर्थ आचार्य वेदांत वाचस्पती पूज्यश्री जगन्नाथ महाराज पवार (अण्णासाहेब) यांचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
काव्यतीर्थ आचार्य वेदांत वाचस्पती पूज्यश्री जगन्नाथ महाराज पवार (अण्णासाहेब) यांच्या मूर्ती अनावरणानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, कृषि मंत्री अब्दुल सत्तार, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार बबनराव पाचपुते, आमदार बालाजी किणीकर, मारुती महाराज कु-हेकर, देवगिरी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आप्पासाहेब गावंडे, सचिव कमलाकर पेरे, पदाधिकारी उपस्थित होते.
भक्ती हा ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा सरळ आणि सोपा मार्ग संतांनी दाखविला. त्या संत परंपरेचे जगन्नाथ महाराज प्रतीक होते आणि नव्या पिढीला त्यांनी आपला वारसा सोपवला, त्या अर्थानेही त्यांचे कार्य महाराष्ट्राच्या अध्यात्मिक उन्नतीला बळ देणारेच आहे, असे स्पष्ट करून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जगन्नाथ महाराज यांची कीर्तने गहन तत्त्वज्ञान, सोप्या भाषेत सांगण्याची हातोटी, मार्मिक विनोद, शाब्दिक कोट्या आणि वर्तमानातील संदर्भ अशा अनोख्या शैलीने मनापर्यंत पोहोचत होती. त्यामुळे लोक मंत्रमुग्ध व्हायचे व्हायचे, असे सांगितले.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, स्वरयंत्राचा कॅन्सर झाल्यामुळे जगन्नाथ महाराज यांची कीर्तनसेवाच खंडित झाली. पण अशा प्रसंगी त्यांनी जिद्द न सोडता वाणी खंडित झाली तर लेखणी हातात धरली आणि ग्रंथरचनेस सुरुवात केली. तब्बल ६१ ग्रंथ त्यांनी लिहिले. यातील ‘विष्णुसहस्रनाम विवरण’ हा दहा खंडांचा ग्रंथ तर अभूतपूर्व आणि अतिमहत्त्त्वाचा आहे, असेही सांगितले आणि संस्थेच्या नियोजित प्रकल्पाला मदत करण्याचे आश्वासन दिले.
प्रास्ताविक आचार्य तुषार भोसले यांनी केले. कार्यक्रमाला वारकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.