शिवसेना पळविणाऱ्या वालीचा वध करावाच लागेल – उद्धव ठाकरेंची शिंदेवर टीका

नाशिक, २३ जानेवारी २०२४: शिवसेनाप्रमख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती साजरी केली जात असताना नाशिक येथील मेळाव्यात ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार प्रहार केला. शिवसेना पळवणाऱ्या वालीचा आपल्याला राजकीय वध करावाच लागेल, अशी टीका केली.

“प्रभू रामचंद्र हे कोणत्याही एका व्यक्तीची किंवा पक्षाची मालमत्ता नाही. तशी तुम्ही करत असाल तर भाजपामुक्त राम आम्हाला करावा लागेल. ज्यांनी तुम्हाला सत्तेपर्यंत पोहचवलं तेव्हा शिवसैनिक तुमच्या बरोबर होते त्यांचा तुम्हाला विसर पडला? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. श्रेय घ्यायचं असेल तर घ्या पण प्रभू रामाचा एक तरी गुण तुमच्यात आहे हे आम्हाला कळू द्या. वचन मोडणारे लोक रामभक्त कसे होतील?”
“संजय राऊतांनी रामाने वालीचा वध का केला ते सांगितलं. आपल्यालाही वालीचा वध करावा लागेल कारण त्यांनी आपली शिवसेना पळवली आहे. ज्यांनी माझ्या भगव्याशी प्रतारणा केली आणि आपल्या हक्काची शिवसेना पळवणारे वाली आणि त्यांचे कुणीही वाली असतील त्यांचा आम्ही राजकीय वध केल्याशिवाय गप्प बसणार नाही.” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.

भाजपाकडून विचारलं जातं ७५ वर्षे काँग्रेसने काय केलं विचारलं जातं मी आता यांना विचारतो तुम्ही १० वर्षांत काय केलं? देश समर्थ होणार असं आता म्हणत आहेत. मग इतकी वर्षे काय अंडी उबवत होतात का? असा बोचरा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून मी सुद्धा प्रचार केला होता. त्यावेळी आम्ही भ्रष्टाचारी दिसले नाहीत का? ज्यांच्या जोरावर तुम्हाला दिल्ली दिसली त्यांना गुन्हेगार ठरवत आहात? किशोरी पेडणेकर, राजन साळवी, सूरज चव्हाण, रवींद्र वायकर हे सगळे गुन्हेगार आहेत का? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

बाबरी पाडली तेव्हा भाजपाचे लोक होते कुठे? राजन साळवी आज मला भेटले मला म्हणाले मी वाकणार नाही. संजय राऊत तुरुंगात जाऊन आला आहे. माझा शिवसैनिक कुणाला घाबरत नाही. मुंबई महापालिकेचा घोटाळा काढत आहेत. काढा, खुशाल सगळं बाहेर काढा. पण पीएम केअर फंडाचा घोटाळाही बाहेर काढा. पीएम केअर म्हणजे हास्यजत्रेतला प्रभाकर मोरे फंड नव्हता अरे वसाड्या पैसे दे असं नव्हतं. लाखो कोट्यवधी रुपये कुणाकडे गेले त्याचा हिशेब द्या. त्यानंतर भ्रष्ट नसलेल्या शिवसैनिकांवर भ्रष्ट बुद्धीवाल्यांनी बोलावं. असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप