uddhav Thackeray

उद्धव ठाकरे मोदींना म्हणाले, “बुरी नजरवाल्यांचे तोंड काळे करणार”

मुंबई, २४ जानेवारी २०२३ : मुंबईवर डोळा ठेऊन राजकारण करणाऱ्या आणि महापालिकेच्या बँकेतल्या ठेवींवर नजर असणाऱ्यांनी निवडणुकीत समोरासमोर यावे मुंबईकडे बुऱ्या नजरेने पाहणाऱ्यांचे तोंड काळे केल्याशिवाय राहणार नाही, असे आव्हान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज थेट पंतप्रधान मोदींचे नाव न घेता दिलेे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी मुंबई महापालिकेच्या बँकेतील ठेवींचा संदर्भ देत पैसे बँकेत ठेवून विकासकामे होत नसतात, असे म्हटले होते. त्याचा संदर्भ देत ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘‘ महानगरपालिकेचे बँकेत पैसे ठेऊन काय करायचे आहे. बँकेतील पैसा विकासासाठी वापरला पाहिजे. या वाक्यावरून त्यांच्या मुंबईवर डोळा का आहे, हे समजते. मुंबईकडे ते सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून पाहत आहेत. मुंबई आमच्यासाठी मातृभूमी आहे. शेकडोंच्या त्यागातून मुंबई महाराष्ट्रात राहिली आहे. त्यामुुळे मुंबईकडे बुरी नजर करून पाहणाऱ्यांचे तोंड काळे केल्याशिवाय राहणार नाही.’’

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील षणमुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे बोलत होते. ठाकरे म्हणाले, ‘‘ पंतप्रधान मोदी यांनी मुंबईत येऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात भूमीपूजन केलेल्या कामांचे उद्घाटन केले. सर्वांचा डोळा महापालिकेच्या पैशांवर आहे. मात्र, फार कमी लोकांन माहिती आहे. मी एकेकाळी महापालिका तोट्यात होती. मोठ्या कष्टाने आम्ही ती फायद्यात आणली. आता यांचा डोळा या पैशावर आहे. त्यांच्या या भूमिकेवरून भक्त अंध आहेत हे पाहिले मात्र, गुरूदेखील आंधळा आहे हे या निमित्ताने कळाले’’
आर्थिक केंद्रे गुजरातकडे नेले तरीही आता त्यांचा मुंबईवर डोळा आहे. रक्त सांडून मिळविलेली मुंबई तुम्हाला देणार नाही. या मुंबईकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याच्याशी दोन होत करायला तयार असल्याचा पुनरूच्चार ठाकरे यांनी केला.आधी महाराष्ट्रात येणाऱ्या कंपन्या गुजरातला नेऊन लाखो रोजगार हिरावले. शेजारील काही राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक घेऊन जात आहेत. आमचे मुख्यमंत्री दाओसला जाऊन बाकरवडी तयार करण्याचे प्रकल्प घेऊन येत आहेत, असा टोलाही ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.