मराठ्यातील दोन चार माकड फडणवीसांच्या बाजूने – जरांगे पाटील यांची टीका
लातूर, ९ जुलै २०२४: मराठा समाजाचे २-४ माकडं फडणवीसांच्या बाजूने बोलून समाजात नाराजी पसरवत असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी टीका केलीयं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आमदारांनी घेतलेल्या भूमिकेवरुन मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्तेत असलेल्या मराठा आमदारांवरही निशाणा साधलायं. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांची राज्यभरात शांतता रॅली सुरु आहे. लातूरमध्ये जरांगे यांची रॅली असून रॅलीच्या सांगतेदरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते.
मनोज जरांगे म्हणाले, मराठ्यांचे मंत्री म्हणतात की हे आरक्षण टिकणारं नाही. आरक्षण हेच देणार आहेत, अन् उडवणारही हेच. म्हणजेच सगेसोयरेची अंमलबजावणी हेच करणार आणि उडवणार हे नक्की आहे. सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळत असल्याने यांच्या पोटात दुखतं असल्याची टीका मनोज जरांगे यांनी केलीयं. सगे सोयरे अंमलबजावणी यांनीच द्यायची आणि टिकवायची जबाबदारी सुद्धा यांचीच राहील. आम्हाला गॅझेट सुद्धा लागू पाहिजे, असं ते म्हणाले.
सौम्य पद्धतीने टीका असं कोणतंही बोलणं नाही…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत काल बोलणं झालं आहे. गॅझेट अंमलबजावणी होणार असल्याचं सांगितलं आहे, त्यानंतर मी सगेसोयरे अंमलबजावणीबाबत आमच्या पद्धतीने हवी असल्याचं मी सांगितलं असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय. तसेच सरकारवर सौम्य पद्धतीची टीका वैगेरे अशी कोणतीही चर्चा माझी झालेली नाही, सरकारने तत्काळ मागण्यांवर अंमलबजावणी करण्याबाबतच बोलणं झालं असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलंय.
भुजबळला फुकट आरक्षण….
छगन भुजबळला कष्टाने कसं खावं लागतं, हे माहित नाही. छगन भुजबळ तुला फुकट आरक्षण मिळालं आहे. तुला या आरक्षणाची किंमत कळायची नाही. ज्याने कष्टातून, संघर्षातून आरक्षण मिळवलं त्यालाच आरक्षणाची किंमत माहिती आहे. आमचं 16 टक्के आरक्षण छगन भुजबळने घेतलंयं, फुकट खायला गोड लागतं. संघर्ष करुन बघ मग कळेल की, कष्टाचं अन् फुकट खाण्यात काय मज्जा आहे, अशी जळजळीत टीका मनोज जरांगे यांनी केलीयं.