विधान भवनातील ठाकरे गटाच्या कार्यालयातून मशाल चिन्ह गायब
नागपूर, ६ डिसेंबर २०२३: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सध्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेत आहेत. त्यापूर्वी निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मूळ बोधचिन्ह बहाल केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल चिन्ह देण्यात आले. पण, नागपुरातील विधानभवन परिसरात देण्यात आलेल्या पक्ष कार्यालयाच्या फलकावरून मशाल चिन्ह गायब करण्यात आले आहे.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विधानभवन सज्ज झाले आहे. विधान भवन परिसरात विविध राजकीय पक्षांचे विधिमंडळ पक्ष कार्यालय आहेत. त्या कार्यालयाच्या फलकावर पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या पक्षाची चिन्हे आहेत. परंतु उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यालयाच्या फलकावर मशाल चिन्ह नाही. त्या फलकावर केवळ शिवसेना पक्ष कार्यालय नमूद आहे.
हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात पुढील सुनावणी घेणार आहेत. नार्वेकर हे अधिवेशनानंतर दोन दिवस नागपुरातच सुनावणी घेणार आहेत. अधिवेशन संपल्यानंतर लगेच कागदपत्रे मुंबईला आणणे कठीण आहे. त्यामुळे सुनावणी नागपूरला होणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठी एकच कार्यालय
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडली आहे. दोन्ही गटाचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी वेगवेगळे आहेत. पण, हिवाळी अधिवेशनात विधिमंडळ परिसरातील या दोन्ही गटाचे काम एकाच कार्यालयातून चालणार आहे. या दोन्ही गटांना एकच कार्यालयात देण्यात आले आहे.