आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा बेरोजगारी, गुन्हेगारीवर बोला रोहित पवार यांचा जितेंद्र आवाडे यांना घरचा आहेर
मुंबई, ४ जानेवारी २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील शिबिरात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. प्रभू श्रीराम वनवासाच्या काळात मांसाहार करत होते, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अजित पवार गट, भाजपाच्या नेत्यांकडून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात असतानाच आता त्यांच्याच गटातील आमदार रोहित पवार यांनीही आव्हाड यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
रोहित पवार यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी आव्हाड यांना एक सल्ला दिला आहे. आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, राज्यातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जातीजातीत निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची गरज आहे
देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही राजकारण करू नये. पण, देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे, अशा शब्दांत रोहित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
काय म्हणाले होते आव्हाड ?
राम हा बहुजनाचा होता. राम मांसाहारी होता. तुम्ही आम्हाला का शाकाहार शिकवत आहात. ते चौदा वर्ष जंगलात राहत होते, असं असताना ते केवळ कंदमुळे खात होते का? ते शाकाहारी कसे असू शकतात, तर नाही. ते मांसाहार देखील करत होते, असं आव्हाड यांनी केलं. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जातोय, असंही आव्हाड म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसाचे शिबिर शिर्डी येथे सुरु आहे. या शिबिराच्या दुसऱ्या सत्रात आव्हाड कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन करत होते. अनेक विषयांवर भाष्य करत असताना आव्हाड यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर वाद अधिकच वाढताना दिसत आहे. अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा जवळ आलेला असतानाच आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.