अटल भूजल योजनेच्या उद्दीष्टपूर्तीसाठी नियोजनबद्धरित्या काम करावे- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे, 17 फेब्रुवारी 2023: अटल भूजल योजनेच्या उद्दीष्टपुर्तीसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी जिल्ह्यात नियोजनबद्ध व प्रभावीपणे अमंलबजावणी करावी आणि योजनेत अधिकाधिक नागरिकांचा सहभाग वाढवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत आयोजित अटल भूजल योजनेअंतर्गत अटल भूजल पंधरवडा तसेच जिल्हा व तालुकास्तरीय संलग्न विभाग एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक संतोष गावडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे, इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजय परीट, बारामती पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी नंदन जरांडे, सहायक वरिष्ठ भूवैज्ञानिक सुजता सावळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने देशासह राज्यात अटल भूजल योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यानुसार या योजनेची बारामती, पुरंदर व इंदापूर तालुक्यातील गावात कामे सुरु आहेत. मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, जलसंपदा विभाग, कृषी विभाग तसेच ग्रामविकास विभाग या सर्व यंत्रणांनी समन्वयाने योजनेची अंमलबजावणी करावी.

गावपातळीवर अधिकाधिक नागरिकांपर्यंत या योजनेविषयी माहिती पोहोचवावी. नागरिकांचे सातत्याने प्रशिक्षण आयोजित करावे. या माध्यमातून पाणी वापराबाबत लोकशिक्षण देण्याची गरज आहे. गाव पातळीवर शोषखड्ड्यांचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न करावेत. शालेय पातळीवर कार्यक्रमाचे आयोजन करुन विद्यार्थ्यांपर्यत माहिती पोहोचवावी. आराखडे तयार करताना नागरिकांना सहभागी करुन घेत ते सोप्या भाषेत तयार करावेत. योजनेंतर्गत झालेल्या कामांचे मूल्यमापन करुन त्यामधील त्रुटीची पुर्तता करावी. एकूणच योजना यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले.

श्री. गावडे म्हणाले, पुरंदर, बारामती व इंदापूर या तालुक्यातील एकूण १०६ ग्रामपंचायती ११८ गावांमध्ये अटल भूजल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेविषयी ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती करण्याबरोबरच लोकसहभागातून योजनेचे उद्दिष्टपुर्तीसाठी २७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत अटल भूजल पंधरवडाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतस्तरावर जल सुरक्षा आराखडा तयार करणे, शेतकरी, महिला मेळाव्याचे आयोजन करुन अटल भूजल योजना तसेच शासकीय योजना तसेच पाणी बचतीविषयी माहिती देण्यात येत आहे. जिल्हा व तालुकास्तरीय सभांचे आयोजन करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

बालदिनाचे औचित्य साधून शालेय पातळीवर शालेय भूजल सप्ताह आयोजित करुन विद्यार्थ्यांमध्ये पाणी बचतीविषयी जनजागृती करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीध्ये पाणीपातळी, पाणी गुणवत्ता, आणि पर्जन्यमान आराखडा दर्शविणारे भितींचित्रे लावण्यात आलेली आहेत. तसचे योजनेचे स्वागत फलकही लावण्यात आलेले आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या हस्ते अटल भूजल योजनेच्या प्रचार साहित्य व योजनेविषयी नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी१८००११०१२१ या टोल फ्री क्रमांकाचे अनावरण करण्यात आले.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप