‘दावोस’ दौऱ्यावर ‘ते’ स्वतःच्या खर्चाने गेले, दिशाभूल थांबवा – आदित्य ठाकरेंच्या टीकेला उदय सामंतांचे प्रत्युत्तर

मुंबई, १५ जानेवारी २०२४: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या टीकेनंतर राज्य सरकारचा दावोस दौरा वादात सापडला आहे. मात्र आदित्य ठाकरे यांनी ज्यांच्यावर टीका केली ते स्वतःच्या खर्चाने सरकारला मदत करण्यासाठी दावोसला गेले आहेत, त्यावर कोणाचा आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही. शिवाय राज्य शासनाच्या तिजोरीतून ज्या गोष्टी खर्च झाल्या आहेत, त्या पै-पैचा हिशोब देणार आहे, अशी घोषणा करत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारच्या शिष्टमंडळाचा दावोस दौरा आजपासून सुरु होत आहे. १५ ते १९ असे चार दिवस हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात एमआयडीचीचे १४ जणांचे, एमएमआरडीएचे पाच जणांचे शिष्टमंडळ आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी या दौऱ्यात राज्यात उद्योग येण्याच्या दृष्टीने सामंजस्य करार होण्याची आशा आहे. याशिवाय आणखीही काही जणांचा या शिष्टमंडळात समावेश आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी या दौऱ्यात ७० जणांचे शिष्टमंडळ असल्याचे म्हणत जोरदार टीका केली होती. घटनाबाह्य मुख्यमंत्री दावोसला जात आहेत. दावोसला जाणाऱ्या राज्याच्या शिष्टमंडळात ५० हून अधिक लोक आहेत. मात्र, यात एकही बिजनेसमन नाही. त्यात, अधिकारी, कर्मचारी, खासदार, माजी खासदार, मुख्यमंत्र्यांचे ओसएडी यांचा समावेश आहे. काही जण तर मुलांनाही सोबत घेऊ जात आहेत. ही संख्या ७० च्या आसपास पोहोचली आहे.

यातील बुहतेक जणांचा सरकारशी किंवा तिथं होणाऱ्या सामंजस्य कराराशी काहीही संबंध नाही, या दौऱ्यावर मुख्यमंत्री आणि अन्य अधिकाऱ्यांसह केवळ १० जण जाणे अपेक्षित आहे. एवढी लोक तर केंद्राच्या शिष्टमंडळातही नसतात. मात्र, हे तर अख्खं वऱ्हाड चालल आहे, विशेष म्हणजे, या दौऱ्यावर जाताना केंद्रीय परराष्ट्र मंत्रायलाची आणि अर्थ खात्याची परवानगी लागते. मात्र, केवळ १० जणांनाच परवानगी मिळाली आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले होते.

या टीकेनंतर सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन शासनाची भूमिका स्पष्ट केली. सामंत म्हणाले, पोलिसांच्यामाध्यमातून उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवणाऱ्यांनी उद्योग कसे वाढवावे आणि किती लोकांचे शिष्टमंडळ घेऊन जावे, यावर मार्गदर्शन करण्याची गरज नाही. ‘एमआयडीसी’चे १४ आणि ‘एमएमआरडीए’च्या पाच जणांचे शिष्टमंडळ दावोसला गेले आहे. तर, तीन जण स्वर्खचाने दावोसला गेले आहेत. यावर आक्षेप असण्याचे कारण नाही.

ज्यांनी कधीही स्वत:च्या खिशातून पैसे काढले नाहीत, त्यांना आक्षेप घेऊ वाटत असावे. पण आदित्य ठाकरेंनी २१ तारखेपर्यंत वाट पाहायला हवी होती. नक्की किती खर्च झाला आहे, हे पाहायला हवे होते. यंदाचा दावोस दौरा कमी पैशात झाला आहे. शिष्टमंडळ मोठे असले तरीही ‘एमएमआरडीए’ आणि ‘एमआयडीसी’ त्यांचे सामंजस्य करार करणार आहेत. त्यामुळे लोकांची दिशाभूल थांबवावी अशी टीका सामंत यांनी केली आहे.