कुणबी प्रमाणपत्र नसणार्या मराठ्यांच्या आरक्षणासाठी होणार स्वतंत्र कायदा : चंद्रकांत पाटील

पुणे, २१ डिसेंबर २०२३ : कुणबी प्रमाणपत्राची नोंद शोधून त्या आधारे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून मनोज सारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन सुरू आहे. तसेच सरकारने या संदर्भात कायदा न केल्यामुळे २४ डिसेंबर पासून जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. अशा स्थितीत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात महत्त्वाची घोषणा केली. ज्या मराठ्यांकडे कुणबी प्रमाणपत्र नाही अशा मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र कायदा केला जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या चर्चेला त्यावेळी वळण लागण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्या वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला पाटील यांनी गुरुवारी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी साधलेल्या संवादात त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले,‘‘कुणबी प्रमाणपत्रासाठी आवश्यक नोंदी सापडणार नाहीत, त्या मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी एकच मार्ग शिल्लक आहे आणि तो म्हणजे मराठा समाज मागास आहे, हे सिद्ध करणे. म्हणूनच हे सर्वेक्षण केले जाईल. एका दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी सर्व महसूल यंत्रणेचे सहकार्य घेण्यात येईल. तसेच, ‘सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज मागास आहे, हे का मान्य केले नाही’, याचा देखील अभ्यास केला जाईल. कुणबी नोंदीसंदर्भात १९६७ चा कायदा आहे. या कायद्यात २००४, २०१२ मध्ये दुरुस्ती करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो कायदा काही नव्याने केलेला नाही. कुणबी प्रमाणपत्रासाठी नोंद कशा शोधायच्या, कुणबी प्रमाणपत्र कसे द्यायचे, याची प्रक्रिया मोठी आहे. यात प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांनाही हमीपत्र द्यावे लागते. त्यामुळे नोंदणी नसताना खोटे कुणबी, एससी, एसटी असे कोणतेही प्रमाणपत्र दिले जाणार नाही.’’
‘नाचता येईना अंगण वाकडे’, अशी विरोधकांची स्थिती झाल्याची टिप्पणी पाटील यांनी यावेळी केली. मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यात चांगला संवाद होत असल्याचेही त्यांनी सांगितले. पाटील म्हणाले,‘‘जरांगे पाटील यांनी मांडलेल्या मागण्या पूर्ण होत आहेत. मुळात कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते, त्यामुळे त्यांच्या आंदोलनाची सुरवात झाली. अशा प्रकारच्या प्रमाणपत्रांची मागणी होते, तेव्हा त्यावरील संशोधन सुरू होते. काही कोटी नोंदी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून झाल्या आहेत. बऱ्याच जणांना कुणबी प्रमाणपत्र देखील मिळेल, त्याबाबत जरांगे पाटील समाधानी आहेत.’’
पुस्तक महोत्सवाबाबत पाटील म्हणाले,तरुण पिढी वाचत नाही, असा भ्रम होता. पण पुस्तक महोत्सवातील तरुण पिढीचा प्रतिसाद पाहता हा भ्रम दूर झाला आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी खूप उत्सुकतेने पुस्तकांचे निरीक्षण करत आहेत. चार जागतिक विश्वविक्रम येथे नोंदविले गेले असून हे या महोत्सवाचे वेगळेपण आहे.’’
………
इन्फोबॉक्स :
भाजपमध्ये कामगिरी अहवाल घेतला जातो
भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुण्यातील आमदारांच्या कामगिरीचा अहवाल मागविल्याच्या चर्चेत तथ्य आहे का, याबाबत विचारले असता पाटील म्हणाले,‘‘भाजपमध्ये ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदार या सगळ्यांची कामगिरी पक्षाच्या वतीने तपासली जाते. आपल्याकडून लोकांना समाधान देणारी झाली पाहिजेत, याबाबत पक्ष आग्रही आहे. त्यामुळे केवळ पुण्यातूनच नव्हे, तर सगळ्या जिल्ह्यांमधील लोकप्रतिनिधींकडून कामगिरीचा अहवाल घेतला जातो.’’

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप