पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावर विधानसभेत जोरदार चर्चा, फडणवीसांनी केली पोलिसांची पाठराखण

मुंबई, २८ जून २०२४: पुणे हिट अँड रन प्रकरणात सरकारच्या मंत्र्याने पुणे पोलिसांना फोन केल्याची चर्चा होती. पोलिसांवर दबाव आणण्यासाठी हा फोन केल्याचं सांगितलं जात होतं. आज विधानसभेत याबाबतचा प्रश्न विचारला गेला. त्यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. या घटनेत एकाही मंत्र्याने पोलिसांना फोन केला नव्हता. पोलिसांवर कुठल्याही मंत्र्याने दबाव आणला नाही, असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. विधानसभेत आज पुणे हिट अँड रन प्रकरणावर लक्ष्यवेधी मांडण्यात आली होती. यावेळी आमदारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी हा खुलासा केला.

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुणे प्रकरणी प्रश्न विचारला. हिट अँड रन प्रकरणानंतर कोणत्या मंत्र्याचा पोलिसांना फोन गेला त्याचं नाव जाहीर करा. तसेच कोणत्या मंत्र्याचा या प्रकरणात दबाव होता का? असा सवाल आव्हाड यांनी केला. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी हे उत्तर दिलं. कुठल्याही मंत्र्यांनी पोलिसांना फोन केला नाही. या घटनेनंतर स्थानिक आमदार तिथे गेले होते. स्थानिक आमदाराने त्याची माहिती दिली आहे. का गेले होते? याचं कारणही त्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणात कोणत्याही मंत्र्याने दबाव आणला नाही. कुणाचाही फोन गेला नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

तर म्हणाल नरेटिव्ह सेट करतोय

यावेळी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनीही फडणवीस यांना सवाल केला. या प्रकरणात मुलाने दारू घेतली हा मुद्दा आहेच. पण त्यापेक्षा ड्रग्सचा मुद्दा महत्त्वाचा आहे. आरोपी दारू प्यायला या पेक्षा ड्रग्सचा विषय महत्त्वाचा आहे. ससूनशी ललित पाटीलचं नातं जोडलं गेलं. या घटनेतही ससून हॉस्पिटलचं नातं जोडलं गेलं. डॉ. तावडे कोण आहे? फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट अजूनही आला नाही, तरीही तुम्ही संबंधितांना क्लीनचिट दिली आहे. या घटना ड्रग्समुळे घडत आहेत. ड्रग्स कुठून येतात हे मी सांगणार नाही. उद्या म्हणाल खोटे नरेटीव्ह तयार करत आहेत. ड्रग्सच्या बाबत तुम्हीच स्पष्टता मांडावी. डॉ. तावडे यांना कुणाचा पाठिंबा होता?ललित पाटीलला व्हीआयपी ट्रीटमेंट कशी दिली? याची उत्तर द्या. हिट अंड रन केसमधील आरोपीच्या रक्त नमुन्यात ड्रग्स येणार नाही याचा संशय आहे. त्याचा खुलासा करावा, असं नाना पटोले म्हणाले.

आंतरराष्ट्रीय रॅकेट

पटोले यांनी केलेल्या प्रश्नाची उत्तरेही फडणवीस यांनी दिली. कोणताही राजकीय दबाव असता तर एवढी कारवाई झाली नसती. डॉ. तावडे, घाटकांबळे यांना सस्पेंड केलं आहे. ललित पाटील प्रकरण कुठे सुरू झालं हे मी सांगितलं होतं. तेव्हाच्या आयुक्तांनी कुणाला पत्र लिहिलं? ते कसं दुर्लक्ष केलं? हे मी आधीच सांगितलं आहे. पण हे आपण राजकारणाच्या पलिकडे जाऊन पाहिलं पाहिजे. आपल्या तरुण पिढीला ड्रग्सचा विळखा लावण्याचं काम सुरू होतं. पूर्वी बाहेरून ड्रग्स आणावे लागत होते. आता केमिकल्स ड्रग्ज तयार होतात. ते आपल्याकडेच होतात. कुरकुमला कारखाना सील केला. तिथे ड्रग्स सापडलं. 6 हजार कोटीचा माल जप्त केला. हा माल तिथून दिल्लीला जायचा. तिथून खाण्याच्या पदार्थातून ते परदेशात पाठवला जायचा. हे आपण शोधून काढलं. हा आपल्या पुरता विषय मर्यादित नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे व्यवहार होत आहेत. त्यामुळे केंद्राने सर्व राज्याची बैठक घेतली. त्यांनी रणनीती आखली. त्यानंतर त्यांनी कमिट्या तयार केल्या. विविध राज्याच कोऑर्डिनेशन सुरू आहे. ते इंटिलिजन्स आल्यानेच आपण कारवाई करत आहोत, असं फडणवीस म्हणाले.