“शिंदे गट आणि भाजपात वितुष्ट निर्माण होऊ शकतं” – आमदार संजय गायकवाडांचा गंभीर इशारा

बुलढाणा, २१ नोव्हेंबर २०२२ ः आत्तापर्यंत एकमेकांच्या चुका पोटात घालणारे शिंदे गट आणि भाजप यांच्यातील मतभेद समोर येण्यास सुरवात झाली आहे. यास निमित्त ठरले आहे ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याचे.

महाविकासआघाडीच्या नेत्यानंतर आता शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी या मुद्द्यावरून शिंदे गट आणि भाजपात वितुष्ठ निर्माण होऊ शकतं, असा थेट इशारा दिला आहे. भाजपाच्या लोकांनी छत्रपती शिवरायांबद्दल विचार करून बोलावं, असे बजावले आहे.

सोमवारी (२१ नोव्हेंबर) बुलढाण्यात पत्रकारांशी बोलत होते. गायकवाड म्हणाले, “भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी सावकरकरांच्या मुद्द्यावर सावरकरांनी पाचवेळा माफी मागितली, तसेच पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिले होते अशी भाषा वापरली. त्या त्रिवेदींनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, छत्रपती शिवाजी महाराजांनी बालसंभाजीसह आग्र्याला औरंगजेबाच्या ज्या दरबारात कोणी मान वर करत नाही, त्या दरबारात ताठ मानेने खडेबोल औरंगजेबाला खडेबोल सुनावण्याचं धाडस दाखवलं. यानंतर आम्ही असा अपमान सहन करणार नाही”“शिवाजी महाराज कधीही माफीनाम्याच्या मागे लागले नाही. शिवाजी महाराज होते म्हणून हा महाराष्ट्र आहे. त्यांनी देशभरात स्वराज्य निर्माण केलं. भाजपाचे राज्यपाल किंवा त्रिवेदी या लोकांनी शिवाजी महाराजांविषयी विचार करून बोललं पाहिजे. यानंतर आम्ही असा अपमान सहन करणार नाही,”