एका कार्डात मावणार नाहीत एवढी कामं; प्रगतीचा पाढा वाचत शिंदेंनी दिला ‘करेक्ट’ कार्यक्रमाचा इशारा
मुंबई, १६ आॅक्टोबर २०२४ : विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर आज (दि.१७) महायुतीकडून संयुक्त पत्रकार परिषध आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांच्या आरोपांची यादी वाचली तर, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका रिपोर्टकार्डमध्ये मावणार नाहीत एवढी काम महायुती सरकारनं केली आहेत असं म्हणत अडीच वर्षांच्या कार्यकाळातील सरकारच्या प्रगतीचा पाढाच वाचून दाखवला. यावेळी शिंदेंनी लाडकी बहीणी योजनेचा उल्लेख करत विरोधकांना करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशाराही दिला.
शिंदे म्हणाले की, पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र नंबर १ आहे. आम्ही एवढी कामं केली की, ती रिपोर्ट कार्डमध्येही मावणार नाहीत. अटल सेतू, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड आदी कामांसह अन्य कामं महायुती सरकारने केल्याचे शिंदेंनी सांगितले. मविआच्या काळात विकासकामांना ब्रेक लागला होता असा घणाघात करत मविआ सरकारनं अडीच वर्षात फक्त प्रकल्प बंद करण्याचं काम केलं. मविआच्या काळात राज्य तिसऱ्या क्रमांकावर होतं पण, महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर राज्य तिसऱ्या क्रमांकावरून थेट पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम आम्ही केल्याचे शिंदे म्हणाले.
…तर करेक्ट कार्यक्रम होणार
शिंदे म्हणाले की, राज्यातील सर्वसामान्य माणसाला आम्हाला ताकद द्यायची आहे, म्हणून आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. पण जर, कुणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला टच केलं तर, करेक्ट कार्यक्रम होईल असा इशारा शिंदे यावेळी दिला. फडणवीसांनी दिलेलं आरक्षणही मविआनं घालवलं होतं. मात्र, आमच्या सरकारनं हे आरक्षण पुन्हा मराठा आरक्षण दिलं. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो असेही शिंदे म्हणाले. उद्योजकांना आम्ही रेड कार्पेट दिले असे सांगत गडचिरोली सारख्या नक्षलवादी भागातही आज उद्योगधंदे सुरू झाले आहेत. रोज सकाळी भोंगा वाजतो, त्यापेक्षा विकासकामं दाखवा असा टोलाही शिंदेंनी राऊतांना लगावला.