“…तर गुलाबराव पाटलांसह माझे पाय कापले जातील”; शिंदे गटाच्या आमदाराचं मोठं वक्तव्य

जळगाव, ६ जून २०२३ ः महाविकास आघाडीमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधीपक्षनेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लागत असताना आता ठाकरे गटातही भावी मुख्यमंत्री म्हणून गुलाबराव पोळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. पण ही चर्चा सुरू करताना त्यांच्या समर्थकांनी भिती देखील व्यक्त केली आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते तसेच पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग मंत्री गुलाबराव पाटील यांचा सोमवारी (०६ जून) वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमत्त जळगावात आयोजित एका कार्यक्रमात गुलाबरावांचे जवळचे नेते आणि निकटवर्तीय उपस्थित होते. यावेळी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी भाषण केलं. या भाषणात गुलाबराव पाटील मुख्यमंत्री होतील, असं म्हणाले. किशोर पाटील यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यावेळी भाषणात आमदार किशोर पाटील म्हणाले, गेल्या २० ते २५ वर्षांपासून मी गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इथे येत आहे. आम्हाला शिवतीर्थानंतर कुठली पर्वणी असेल तरी ती म्हणजे जळगावात इथे भाऊंचा वाढदिवस साजरा करणं. त्यामुळे ०५ जून ही तारीख आपल्या मनात ठासून राहिली आहे. त्याचं चित्र आपण इथे स्पष्ट केलं आहे. मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि भाऊंना शुभेच्छा देतो.

किशोर पाटील म्हणाले, मी इथे अनेकदा आलो आहे. भाऊ आमदार असताना मी इथे आलो आहे. ते जिल्हा प्रमुख, शिवसेनेचे नेते, उपनेते आणि राज्यमंत्री असतानाही मी इथे आलो आहे. आता ते कॅबिनेट मंत्री असताना मी इथे आलो आहे हे माझं भाग्य आहे. परंतु मला याच्यापुढे त्यांना शुभेच्छा देताना थोडसं घाबरावं लागतंय. कारण कॅबिनेट मंत्रीपदानंतरचं पद आहे ते म्हणजे मुख्यमंत्रीपद. जर ते मुख्यमंत्रीपद मी या ठिकाणी जाहीर केलं तर तिकडून सगळ्यांकडून त्यांच्यासहित (गुलाबराव पाटील) माझे पाय कापायला सुरुवात होणार आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप