“मराठा समाजातील तरुणांनी आता उद्योगांकडे वळावे” – ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार
पुणे, ता. २८/१२/२०२२: मराठा तरुणांनी आता आरक्षणाकडून अर्थकारणाकडे गेले पाहिजे. अर्थकारण चांगले असेल तरच समाज सुधारू शकतो. यासाठी मराठा समाजातील तरुणांनी आता विविध उद्योग आणि व्यवसाय करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असा सल्ला राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (ता.२८) येथे दिला.
संभाजी ब्रिगेडचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन पुण्यात आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाचा समारोप शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढाव, प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे, खासदार वंदना चव्हाण आदी उपस्थित होते. या समारंभात पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, प्रा. मा. म. देशमुख आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
पवार पुढे म्हणाले, ‘‘संभाजी ब्रिगेडच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी एक चांगले चर्चासत्र झाले.या चर्चासत्रात उद्योग क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उद्योजकांनी मार्गदर्शन केले. या चर्चासत्राचा विषय हा आरक्षणाशिवाय उद्योगाकडे असा होता. संभाजी ब्रिगेडने हे चांगले काम हाती घेतले आहे. देश-विदेशात मी जातो, तेव्हा मला विविध देशांत अनेक मराठा तरुण-तरुणी भेटतात. तेव्हा अभिमान वाटतो. मराठा समाजातील मुलींनादेखील चांगले शिक्षण दिले पाहिजे.’’
छत्रपती शाहू महाराज यांनी कायम शेतीला आणि उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन दिले. यासाठी शाहू महाराजांनी जयसिंगपूरची बाजारपेठ आणि कोल्हापुरात उद्यमनगरीची उभारणी केली. शाहू महाराजांनी कायम, शेती, जलसंधारण, शिक्षण, उद्योग, व्यवसाय आणि सामाजिक एकता आणि समाज सुधारणांवर भर दिला. भारतीय राज्यघटना लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली आणि सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेकर यांच्या मागे उभे राहण्याची सूचना केली. त्यामुळे आपण शाहू-फुले- आंबेडकर विचारांनी काम केले पाहिजे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आपण लढा देत आहोत. आरक्षण मागणीचा हा लढा यापुढेही सुरु ठेऊ. आरक्षण आज मिळाले नाही तरी, पुढे जातच राहू. पण देशात सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बाजूला ठेऊन काम करू लागले आहेत. त्यांच्या या कृतीला आपण सर्वांनी मिळून रोखले पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी आपली जबाबदारी मानून संविधान वाचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. जयसिंगराव पवार यांचेही भाषण झाले.
‘महिला संभाजी ब्रिगेड स्थापन करा’
संभाजी ब्रिगेडने आता महिलांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान द्यावे. महिला-पुरुष समान आहेत. त्यामुळे संभाजी ब्रिगेडमध्ये महिलांसाठी निम्म्या जागा दिल्या पाहिजेत. यासाठी महिलांची स्वतंत्र संभाजी ब्रिगेड सुरु करावी, अशी सूचना पवार यांनी यावेळी प्रवीण गायकवाड यांना केली.
पुण्याचे नाव जिजाऊनगर करा – देशमुख
राजमाता जिजाऊ यांनी पुणे शहर वसविले आहे. त्यामुळे पुणे शहराचे नाव बदलून ते जिजाऊनगर करावे, अशी मागणी ज्येष्ठ विचारवंत प्रा. मा. म. देशमुख यांनी केली.