शिंदे सरकारने ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा केली कमी
मुंबई, २१ जून २०२३: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याने ठाकरे कुटुंब आणि मातोश्रीची सुरक्षा कमी केली आहे. उद्धव ठाकरे यांना झेड ऐवजी वाय सुरक्षा पुरविली जाणार आहे.
शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटातील चाळीस आमदारांनी भाजपच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली आहे. गेल्या वर्षभरापासून राज्यात निष्ठावंत आणि गद्दार अशी चर्चा सुरू झाली असतानाही कालच शिंदे यांच्या विरोधात गद्दार दिवस म्हणून विरोधकांनी साजरा केला. त्यानंतर आता ठाकरे कुटुंब बाबत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या सुरक्षेततही कपात करण्यात आली आहे. याशिवाय एस्कॉर्ट व्हॅनसह मातोश्रीवरील सुरक्षा कमी करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे.
गृह खात्याकडून अचानक ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. साधारणपणे ६० ते ७० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेसाठी तैनात होते.
परंतु या सर्वांनाच कमी करुन पुन्हा पोलीस ठाण्यात रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. तसेच मातोश्रीवर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एक एस्कॉर्ट गाडी कमी केली असून पायलटही कमी केला आहे. याशिवाय मातोश्रीवर असलेल्या एसआरपीएफ ची सुरक्षा देखील काढून टाकली आहे. उद्धव ठाकरे यांच्या झेड प्लस सुरक्षेमध्ये एक बुलेट फ्रुफ कार, एक पोलीस निरीक्षक, दोन सहायक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, दोन एस्कॉर्ट वाहन त्यामध्ये ६ कॉन्स्टेबल आणि कोणत्याही वेळी १० इतर कॉन्स्टेबल सुरक्षा व्यवस्थेत सहभागी होत होते.