भाजपकडून प्रचाराचा मुद्दा असणारे अयोध्येतील राम मंदिर अर्धवटच, पूर्णत्वासाठी उजाड लागणार तीन वर्ष
पुणे, ११ डिसेंबर २०२३: ‘अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीचे काम अपूर्ण असून, त्यासाठी आणखी तीन वर्षे लागतील. कपड्याच्या तंबूमध्ये असलेल्या प्रभू श्रीरामांना लवकरात लवकर विराजमान करण्यासाठी प्राणप्रतिष्ठेची घाई केली जात आहे. त्यासाठी गाभाऱ्याचे कामकाज पूर्ण झाले असून, प्राणप्रतिष्ठेनंतर भाविकांना अव्याहतपणे श्रीरामांचे दर्शन घेता येईल; तसेच मंदिराच्या कामाला कोणत्याही प्रकारचा अडथळा राहणार नाही,’ असे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी यांनी रविवारी सांगितले.
अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्यात येत असून, त्यामध्ये २२ जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या मूर्तीसाठी वस्त्र विणण्याच्या ‘दो धागे श्रीराम के लिए’ या उपक्रमाच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या गोविंददेवगिरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘राममंदिराचे काम अत्यंत वेगाने सुरू असून, मंदिराचे गर्भगृह, पहिला मजला व श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आवश्यक काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे रामरायाच्या दर्शनाची सुविधा उपलब्ध होईल. या ऐतिहासिक मंदिराचे काम तीन वर्षे सुरू राहणार आहे. श्रीराम मंदिराचे आणखी दोन मजले, आवारातील सहा व आवाराबाहेर सात मंदिरे यांच्या कामकाजाला आणखी तीन वर्षांहून अधिक काळ लागेल. कपड्याच्या तंबूमध्ये अनेक वर्षे राहणाऱ्या रामरायाला लवकरात लवकर विराजमान करण्यासाठी प्राणप्रतिष्ठेची घाई केली जात आहे,’ असे गोविंददेवगिरी यांनी सांगितले.
….
आमचा दृष्टीकोन भक्तीभावाचा, राजकारणाचा नव्हे
आगामी लोकसभा निवडणुकांसाठीच अयोध्येतील श्रीराम मंदिराचे कामकाज अपूर्ण असतानाही, रामरायाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी घाई केली जात आहे का, अशी विचारणा केली असता, ‘आमचा दृष्टीकोन भक्तीभावाचा असून, ज्यांचा राजकारणाचा दृष्टीकोन आहे, त्यांना असे वाटणे स्वाभाविक आहे,’ असे गोविंददेवगिरी म्हणाले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप