पुणे महापालिकेतील स्विकृत नगरसेवकांची संख्या होणार दहा
पुणे, १० जानेवारी २०२३ : राज्यातील महानगरपालिकांतील स्विकृत नगरसेवकांची संख्या वाढण्याचा महत्वाचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेतील स्विकृत नगरसेवकांची संख्या दहा होणार आहे. पालिकांच्या कामकाजात गुणात्मक वाढ करण्याच्या दष्टीकोनातुन हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिका अधिनियम, १९८८ मधील कलम ५(१)(ब) व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम ५(२)(ब) मध्ये स्विकृत नगरसेवकांच्या सदस्यांचे प्रमाण निश्चित केले आहे. त्यानुसार सध्या महापालिकांतील स्विकृत नगरसेवकांची संख्या पाच आहे. मात्र आता महापालिकेतील एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के किंवा एकूण दहा नगरसेवक यापैकी जी संख्या कमी असेल तितकेच स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडले जाण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. पुणे महापालिकेत नगरसेवकांची संख्या १६४ आणि स्वीकृत नगरसेवक पाच आहेत. राज्यसरकारच्या या निर्णयानुसार पुणे महापालिकेत नगरसेवकांची संख्या पाच वरून दहा होणार आहे.
कामकाजात गुणात्मक वाढ होणार
महापालिका प्रशासनास सहकार्य करण्यासाठी व अनुभवी, कार्यकुशल व नागरी प्रशासनाचे ज्ञान असलेल्या व शासनाने केलेल्या नियमानुसार विहित अर्हता धारण करणाऱ्या व्यक्तींची निवड स्वीकृत नगरसेवक म्हणून केली जाते. या नियुक्त केलेल्या नामनिर्देशित सदस्यांच्या ज्ञानाचा वापर करून महापालिकांच्या कामकाजात गुणात्मक वाढ करण्याच्या उद्देशाने नामनिर्देशित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याची आवश्यकता विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
राजकीय पुर्नवसनासाठी केला जातो वापर
सर्वच राजकीय पक्षाकडुन राजकीय पुर्नवसनासाठी स्वीकृत नगरसेवकपदाचा वापर केला जातो. पुणे महापालिकेत आता पर्यत स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्त करण्यात आलेल्या मध्ये अनेकजण पालिका निवडणुकीत पराभव किंवा उमेदवारी न मिळालेलेच आहेत.