इंडिया आघाडीचे नेतृत्व ठरवावे लागेल – उद्धव ठाकरे
नवी दिल्ली, १९ डिसेंबर २०२३ : इंडिया आघाडीचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न आज ना उद्या सोडवावाच लागेल पण मला नेतृत्वाची वेडीवाकडी प्रश्न पडत नाहीत. आम्ही लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र आलो आहोत असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीची बैठक पार पडत आहे. या बैठकीला हजर राहण्यासाठी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे सोमवारी दिल्लीत दाखल झाले. आज मंगळवारी ( १९ डिसेंबर ) उद्धव ठाकरेंनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला लागावे,” असं रणशिंग उद्धव ठाकरेंनी फुकलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “ऑगस्टनंतर ‘इंडिया’ आघाडीची बैठक झाली नाही. कारण, तीन-चार राज्यांतील निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील पक्ष सामील होते. त्यामुळे ऑगस्टनंतर ‘इंडिया’ आघाडीची बैठक होत आहे. तीन राज्यांच्या निवडणुकीवर बैठकीत चर्चा होणं आवश्यक आहे.”
इंडिया आघाडीत २७ घोडे, पण रथाला सारथी नाही. २०२४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर चेहरा असण्याची गरज आहे का? असा प्रश्न प्रतिनिधीनं विचारल्यावर उद्धव ठाकरेंनी म्हटलं, “पंतप्रधानांसमोर चेहरा हा एक विषय आहेच. मात्र, ‘इंडिया’ आघाडीला समन्वयक किंवा एखाद्या चेहऱ्याबाबत आज नाहीतर उद्या विचार करावा लागेल.”
“देशातील लोकशाही जगली, तर देश जगेल”
“आमच्यातील कुणाच्याही डोक्यात नेतृत्वाची हवा भरली नाही. आम्हाला देश वाचवायचा आहे. खासदारांचं निलंबन आणि महाराष्ट्र विधिमंडळातील चित्र पाहून देशातील लोकशाही अंतिम घटका मोजत आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय. पण, देशातील लोकशाही जगली, तर देश जगेल. ती जगवण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र आलो आहोत,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं
‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांनी पंतप्रधान चेहऱ्याबाबत तुमच्या नावावर सहमती दर्शवली तर जबाबदारी घेणार का? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, “मी असं अजिबात बोलत नाही. पण, माझे काही मते बैठकीत मांडणार आहे. मी मुख्यमंत्रीपद हे जबाबदारी म्हणून स्विकारलं होतं. नंतर एका क्षणात ते सोडून दिलं. मी कुठलीही वेडीवाकडी स्वप्न पाहत नाही. देश आणि महाराष्ट्रातील जनता आमच्याकडे पाहत आहे. मी पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहून उपयोग काय आहे? शेवटी हा निर्णय जनतेला घ्यायचा आहे.”
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप