नरेंद्र मोदी न्यायाधीशांच्या घरी अन महाराष्ट्रातील सुनावणी पडली लांबणीवर

नवी दिल्ली, १२, सप्टेंबर २०२४: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या याचिकांवर मात्र सुनावणी होण्याची शक्यता पुन्हा लांबणीवर पडली आहे. आताही याबाबतीत मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी लांबणीवर पडली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता २१ ऑक्टोबर रोजी होईल अशी माहिती मिळाली आहे. आज सुनावणी होणार होती. मात्र आता आणखी पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवरही २१ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. मात्र दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गणपतीच्या आरतीला गेल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही गटांकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र मागील काही दिवसांपासून सुनावणी लांबणीवर पडत आहे. आता राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या आधी याचिकांवर सुनावणी होऊन निर्णय यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र याची शक्यताही लांबणीवर पडत चालली आहे.

याआधी सुद्धा सुनावणी दोन आठवड्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आली होती. आता सुनावणी एक महिन्याने म्हणजेच २१ ऑक्टोबर रोजी होईल अशी माहिती मिळाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरुद्ध उद्धव ठाकरे गटाने एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवरही २१ ऑक्टोबर रोजी सुनावणी होईल असे सांगण्यात येत आहे. आता ही नवी तारीख मिळाली असली तरी आधीचा अनुभव पाहता या दिवशी तरी सुनावणी होईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. आरती केली. या घटनेचे पडसाद देशाच्या राजकारणात उमटत आहेत. विरोधकांनी सोशल मीडियावर मोदी आणि केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. खासदार संजय राऊत यांनीही मोदींवर टीका केली. शिवसेना आणि राष्ट्रवादी संपवण्यासाठी आता न्यायालयाची मदत घेतली जात आहे का असा सवाल त्यांनी केला. या लोकांच्या मनातल्या शंका आता पक्क्या झाल्या असा हल्लाबोल राऊतांनी केला.