उपोषण मागे पण आता तारखे वरून वाद जरांगे पाटील म्हणतात दोन जानेवारी नव्हे २४ डिसेंबर पर्यंत मुदत

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२३ : एकीकडे आश्वासन सरसकट मराठ्यांना आरक्षणाचं आहे की फक्त कुणबी प्रमाणपत्र देण्याचं यावरून राज्य सरकार व मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकांमध्ये तफावत निर्माण झाली असताना आता सरकारला दिलेल्या मुदतीबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. मनोज जरांगे पाटील राज्य सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिल्याचं ठामपणे सांगत आहेत. मात्र, खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र जरांगेंनी सरकारला २ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे, असा दावा पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे आता या मुद्द्याची चर्चा होण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला दिलेल्या मुदतीसंदर्भात विधान केलं. “२ जानेवारीपर्यंत दोन महिन्यांचा वेळ मिळाला आहे. त्यात दोन महिन्यांत बरंचसं काम पूर्ण केलं जाईल. ठरवलेलं काम नक्की होईल. त्यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा सरकार लावेल”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दरम्यान, मुदतीसंदर्भातल्या या संभ्रमावर टीव्ही ९ शी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची बाजू मांडली आहे. आपण २४ तारखेपर्यंतच सरकारला मुदत दिली आहे, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत. “सगळ्यांच्या समोर ठरलं आहे. तेच म्हणाले होते की २४ डिसेंबरपर्यंत समितीला वेळ दिलाय तेवढाच. आम्ही म्हटलं होतं एक महिना ठेवा. पण गायकवाड साहेबांचा शब्द आम्ही मानला. बच्चू कडू याला साक्षीदार आहेत. बाकी कुणी काहीही म्हटलं तरी फरक पडत नाही. ते म्हणाले २४ डिसेंबर तरी राहू द्या”, असं जरांगे पाटील म्हणाले.

“बोलण्यात-ऐकण्यात काही झालं असेल. मला वाटत नाही तो काही ७-८ दिवसांचा विषय फार मोठा आहे. पण खरं बोलायचं तर २४ डिसेंबरची मुदत ठरली आहे. आम्ही तेही देत नव्हतो. पण आता त्यांनी पूर्ण महाराष्ट्रासाठी आरक्षणाची प्रक्रिया सुरू केली. सगळ्या गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होणार आहे. म्हणून आपण २४ डिसेंबरला ओके म्हणालो”, असंही जरांगे पाटील यांनी नमूद केलं.

“सरकारवर विश्वास आहे. त्यांनी वेळ घेतली आहे. पण आम्ही कधीपर्यंत दम धरायचा? आता त्यांनी आरक्षण नाही दिलं तर मात्र सरकारला जड जाईल. मुंबईत जायची वेळ येणार नाही. पण आली तर मी जाणारच. मग ते सरकारला परवडणार नाही. आंदोलन शांततेतच होईल, पण मग आम्ही ताकदीनं जाणार. आरक्षण दिलं नाही तर मुंबईच्या पूर्ण नाड्या बंद करून टाकीन मी”, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप