पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा काळ हा देशाचा पुनर्निमाण काळ – तेजस्वी सूर्या

पुणे, दि. २० फेब्रुवारी, २०२३ : भारताचा शेजारी पाकिस्तान हा दिवाळखोरीच्या वाटेवर असून विदारक परिस्थितीचा सामना करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात २०१४ सालापासून आपल्या देशाचा पुनर्निमाण काळ सुरू झाला आहे. अर्थसंकल्पातील अनेकविध तरतुदी, पायाभूत सोयीसुविधा, हरित ऊर्जेला देण्यात येत असलेले अनन्यसाधारण महत्त्व, २०१४ ते २०२३ दरम्यान दुप्पट झालेले दरडोई उत्पन्न, दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचा होत असलेला विकास हे याचेच द्योतक आहे. आपली पिढी ही खऱ्या अर्थाने याची साक्षीदार असून या काळात आपली भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी आज पुण्यात केले.

शहरातील उद्योजकांशी तेजस्वी सूर्या यांनी सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जे डब्लू मरिएट येथे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुढील २५ वर्षे ही देशनिर्माणाच्या या प्रक्रियेतील सुवर्णकाळ असणार असून आपली पिढी लवकरच देशाला ‘सुपर पॉवर’ झालेला पाहू शकेल, असा विश्वास देखील त्यांनी या वेळी व्यक्त केला. गेल्या आठ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजना आणि केंद्र सरकारने केलेल्या कामावर प्रकाश टाकत सूर्या म्हणाले, “मजबूत मॅक्रो इकॉनॉमिक फंडामेंटल हा मोदी सरकारच्या यशाचा गाभा असून त्यांनी अंगीकारलेल्या वित्तीय सुज्ञतेची दखल ही जगाने घेतली आहे. आमचे सरकार हे नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यापद्धतीने धोरणात्मक बदल करण्यावर भर देत आहे आणि म्हणूनच नजीकच्या भविष्यात आशादायी, सकारात्मक वृद्धीचे चित्र आपल्याला दिसेल.”

आज नागरिकांसोबतच देशातील अनेक राज्य सरकारांना खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीचे महत्त्व पटले असून, केंद्र अथवा राज्य सरकार हे केवळ सुविधा पुरविणारे ‘फॅसिलिटेटर’ आहेत याची त्यांना जाणीव झाली आहे. हा एक मोठा बदल असल्याचेही सूर्या यांनी या वेळी नमूद केले. २०११- १२ सालापर्यंत कोणतेही राज्य सरकार गुंतवणूकदारांच्या परिषदांचे आयोजन करीत नसत कारण त्यांना त्याचे महत्त्व माहित नव्हते. मात्र, आज परिस्थिती बदलली असून पंजाब, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि केरळ सारखी राज्ये देखील अशा प्रकारच्या परिषदा भरवित आहेत, असेही सूर्या म्हणाले.

प्रत्येक आठवड्याला देशात एक नवे विद्यापीठ स्थापन होत आहे. मागील ७० वर्षांत वाढल्या नाहीत एवढ्या वैद्यकीय महाविद्यालयातील जागा मागील ८ वर्षांत केंद्र सरकारने प्रयत्नपूर्वक वाढविल्या आहेत. आजवर ७० वर्षांत देशात केवळ ७० विमानतळे उभारण्यात आली होती. मागील ८ वर्षांत आम्ही ७० विमानतळे उभारली आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकार पायाभूत सुविधांची उभारणी, स्टार्ट अप्स, सुलभ व डिजिटल प्रक्रिया यांसारख्या अनेक गोष्टींकडे लक्ष देत असल्याचे सूर्या यांनी सांगितले.

लहानपणापासून स्वामी विवेकानंद यांच्या कार्याने प्रभावित होऊन सेवाभावी वृत्तीने मी राजकारणात सक्रीय झालो. हे काम अवघड असले तरी जनतेचे मिळत असलेले प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासाठी बहुमूल्य आहेत, असे सांगत तेजस्वी सूर्या म्हणाले की, मागील दीड वर्षांच्या काळात पक्षाच्या कार्यासाठी मी तब्बल २ लाख किमी इतका प्रवास केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना हे सांगण्याचा एकदा योग आला, तेव्हा तुझ्या वयाचा असताना याही पेक्षा जास्त प्रवास केला होता हे त्यांचे उत्तर ऐकून मी अवाक झालो, अशी आठवण देखील तेजस्वी यांनी सांगितली.

भाजपाचे पक्षश्रेष्ठी दिवस रात्र, सुट्टी आणि इतर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता अविरत कार्यरत असतात त्यामुळे सामान्य कार्यकर्ता आळशी असला तरी सक्रिय होतोच असेही सूर्या यांनी मिश्कीलपणे सांगितले. यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना तेजस्वी यांनी उत्तरे दिली. सोमेंदू कुबेर यांनी प्रास्ताविक करीत उपस्थितांचे आभार मानले.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप